मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी निर्दोष आहेत

अमित शाह यांच्याबद्दल टिप्पणीप्रकरणी आठ वर्षांनंतर दिलासा

वृत्तसंस्था/ सुलतानपूर

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीचा खटला सोमवारी सुलतानपूर येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयाने फेटाळला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल 2018 मध्ये केलेल्या वक्तव्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सुनावणीसाठी राहुल गांधी स्वत: उपस्थित राहिले होते. न्यायालयीन सुनावणीवेळी काशी प्रसाद शुक्ला हे वकील राहुल गांधी यांचे प्रतिनिधित्व करत होते. न्यायालयीन सुनावणीतून बाहेर आल्यानंतर शुक्ला यांनी राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता झाल्याची घोषणा केली.

न्यायालयीन निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवाराबाहेर ढोल वाजवून आणि मिठाई वाटून जल्लोष केला. राहुल गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील कुरेभरजवळ जमले होते. माजी मंत्री ओ. पी. सिंह हे देखील सुमारे 400 वाहनांच्या ताफ्यासह आणि अंदाजे 4,000 लोकांसह दाखल झाले. त्यांच्या समर्थकांची उपस्थिती आणि काँग्रेस नेत्यांची गर्दी हा चर्चेचा विषय ठरला. सुनावणीच्या संभाव्य कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर सुलतानपूरमध्ये विशेषत: न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.

2018 मधील प्रकरण

राहुल गांधी यांच्याशी संबंधित असलेले मानहानी प्रकरण मे 2018 मधील आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान, राहुल गांधी यांनी बेंगळूर येथे एका पत्रकार परिषदेत भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. या वक्तव्यांवर आक्षेप घेत भाजप नेते आणि सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी सुरुवातीला दिवाणी न्यायालयात झाल्यानंतर ते प्रकरण खासदार-आमदार न्यायालयात वर्ग करण्यात आले होते.

राहुल गांधींच्या वाहनताफ्याला अपघात

दरम्यान, सुलतानपूर न्यायालयात हजर होण्यापूर्वी राहुल गांधी यांच्या वाहनताफ्याचा अपघात झाला. त्यात दोन वाहनांची टक्कर झाली. राहुल गांधी सुखरूप असल्याने त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. या अपघातामुळे राहुल गांधी सोमवारी सकाळी सुमारे सव्वाअकरा वाजता सुलतानपूर विशेष खासदार-आमदार न्यायालयात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीच्या अपेक्षेने दिवाणी न्यायालयाच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

Comments are closed.