डुकाटीची इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये एन्ट्री! पुनीत बालन आणि प्रणव बाकरे यांची नवी फ्रँचायझी
क्रीडा क्षेत्रातील उद्योजक पुनीत बालन (Sports entrepreneur Punit Balan) आणि मोटरस्पोर्ट तज्ज्ञ प्रणव बाकरे (motorsport specialist Pranav) यांनी डुकाटीच्या सहकार्याने ‘पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंग’ (PBG Ducati Legacy Racing) या नव्या फ्रँचायझीची घोषणा केली आहे. ही फ्रँचायझी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (ISRL) तिसऱ्या हंगामात सहभागी होणार असून, या माध्यमातून डुकाटी भारतीय सुपरक्रॉस स्पर्धेत उतरणार आहे.
या फ्रँचायझीमध्ये पुनीत बालन समूहाचा क्रीडा क्षेत्रातील गुंतवणुकीचा अनुभव, प्रणव बाकरे यांचे सुपरबाइक आणि मोटरस्पोर्टमधील कौशल्य तसेच डुकाटीचा आंतरराष्ट्रीय रेसिंगमधील वारसा यांचा संगम पाहायला मिळणार आहे. प्रणव बाकरे हे फ्रँचायझीचे सहमालक असतील.
डुकाटीने आयएसआरएलच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम स्पर्धेदरम्यान कॅलिकट येथे भारतात ‘डेस्मो 450 एमएक्स’ ही ऑफ-रोड मोटारसायकल सादर केली होती. आता तिसऱ्या हंगामात ही मोटारसायकल प्रत्यक्ष स्पर्धेत उतरणार आहे. याशिवाय, लवकरच सादर होणारी ‘डेस्मो 250 एमएक्स’ ही मोटारसायकलही या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
पुनीत बालन समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंगचे सहमालक पुनीत बालन यांनी या भागीदारीबाबत सांगितले की, भारतीय रेसिंगमधील उत्साह आणि क्रीडाभावना प्रतिबिंबित करणारी स्पर्धात्मक फ्रँचायझी उभारण्याचा त्यांचा उद्देश आहे. युवा क्रीडापटूंना संधी देणे आणि चाहत्यांशी जोडलेला संघ निर्माण करणे यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्र यांनी सांगितले की, दुसऱ्या हंगामाच्या अंतिम स्पर्धेत भारतात ऑफ-रोड कार्यक्रम सादर केल्यानंतर कंपनीला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. डुकाटीच्या शंभराव्या वर्धापनदिनाच्या वर्षात भारतीय स्पर्धात्मक व्यासपीठावर आपले रेसिंगमधील कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागीदारीतून देशातील नव्या पिढीतील रायडर्सना प्रेरणा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.
प्रणव बाकरे यांनी शर्यतीतील यशासाठी पूर्वतयारी, मोटारसायकलची क्षमता आणि संघाची एकजूट महत्त्वाची असल्याचे सांगितले. पुनीत बालन यांचा संघ उभारण्याचा अनुभव आणि डुकाटीचे आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्टमधील कौशल्य यांच्या मदतीने पहिल्या फेरीपासूनच स्पर्धेसाठी सज्ज असलेला संघ उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयएसआरएलचे सहसंस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे यांनी डुकाटीच्या सहभागाचे स्वागत केले. तसेच, डुकाटीच्या प्रवेशामुळे लीगमध्ये सहभागी होणारा हा तिसरा प्रमुख वाहन उत्पादक ब्रँड ठरला आहे. या सहभागामुळे भारतीय युवा रायडर्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या मोटारसायकलींवर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पीबीजी डुकाटी लेगसी रेसिंगचा संघ आता आयएसआरएलच्या तिसऱ्या हंगामासाठी तयारी करणार असून, स्पर्धात्मक कामगिरी, रायडर्सचा विकास आणि चाहत्यांशी संवाद वाढवण्यावर भर देणार आहे.
प्रणव बाकरे हे पुण्यातील डुकाटीच्या ‘लेगसी मोटर्स’ या डीलरशिपचे मालक असून, ते इंडियन सुपरबाइक लीगचे सहसंस्थापकही आहेत.
Comments are closed.