मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे पाणावले! जिओचे शेअर बाजारात दणक्यात पदार्पण; 21 टक्के प्रीमियमवर समभागाची नोंदणी, गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्स समूहातील जिओ प्लॅटफॉर्म्सने आज शेअर बाजारात दणक्यात पदार्पण केले. जिओच्या लिस्टिंग सोहळ्याला संपूर्ण अंबानी कुटुंबीय उपस्थित होते. लिस्टिंगनंतर उपस्थितांना संबोधित करताना रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत यांनी जोरदार भाषण केले. अंबानी कुटुंबीयांचा सुरुवातीपासूनचा संघर्ष त्यांनी भाषणातून मांडला. मुलाचे हे भाषण ऐकून मुकेश अंबानी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
अनंत अंबानी यांनी आपल्या भाषणात आजोबा धीरूभाई अंबानी यांचा खडतर प्रवास मांडला. जिओला संपूर्ण देशाचा आशीर्वाद लाभला आहे. माझ्या आईने म्हटले, ‘जिओ मेरे लाल’, माझ्या आजीने म्हटले, ‘जुग जुग जिओ’ आणि माझ्या मित्रांनी म्हटले, ‘जिओ यार.’ जिओची उभारणी देशातील जनतेने केली असून जिओला जनतेनेच घडवले आहे, असे अनंत अंबानी यावेळी म्हणाले.
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या आयपीओने बुधवारी शेअर बाजारात धमाकेदार एण्ट्री घेतली आहे. हा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर 21 टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्टिंग झाला. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी शेअरची किंमत 1119 रुपये ठरवण्यात आली होती, परंतु याची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी 1358 रुपयांवर झाली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी या आयपीओतून जोरदार नफा मिळवता आला असून लाखो गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
जिओचा आयपीओ इश्यू प्राइसपेक्षा 300 रुपये म्हणजेच 26.81 टक्के अधिक आहे. यामुळे कंपनीच्या एकूण शेअर्सची मार्केट व्हॅल्यूमध्ये 2.76 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच जिओ प्लॅटफॉर्म्सचे मार्केट कॅप वाढून 13.07 लाख कोटींवर पोहोचले आहे. पहिल्याच दिवशी जिओ प्लॅटफॉर्म्स देशातील दुसरी सर्वात मूल्यवान लिस्टेड कंपनी बनली.
Comments are closed.