महाविकास आघाडीचा महायुतीला धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि छत्रपती संभाजीनगर राखले फडणवीसांच्या नागपुरात भाजपवर पराभवाची नामुष्की; काँग्रेसची बाजी
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडीने तीन जागा जिंकत सत्ताधारी महायुतीला धक्का दिला. पुणे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील विद्यमान आमदार महायुतीकडे गेल्यावरही या दोन्ही जागा राष्ट्रवादीने कायम राखत सत्ताधाऱ्यांना महाविकास आघाडीची ताकद दाखवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली. काँग्रेसने बाजी मारत नागपूर पदवीधरच्या जागेवर विजय मिळवला. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे अधिकृत आणि बंडखोरांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढाईत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार जिंकले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना झाला. काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती होत असल्याने पुणाला धक्का बसणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. या पाचही मतदारसंघांत विजयासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आला नाही. यामुळे दुसऱया पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागल्याने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन विजयी उमेदवाराच्या घोषणेसाठी दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहवी लागली.
मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससने अजित पवार गटाला चांगलाच धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सलग तीन टर्म आमदार राहिलेले अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांना पराभवाची धूळ चारली. चव्हाण हे 2008 मध्ये पहिल्यांदा येथून निवडून आले होते. त्यानंतर सलग तीन टर्म ते आमदार राहिले. महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि गेल्या अठरा वर्षांतील अँटीइन्कम्बन्सीचा मोठा फटका त्यांना निवडणुकीत बसला. पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करता न आल्याने पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयासाठी दुसऱया पसंतीच्या मतांची वाट पाहावी लागली.
अमरावती शिक्षकची जागा शिंदे गटाकडे
अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी कायम राखली. 2020 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सरनाईक यांनी शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे महायुतीत प्रचंड नाराजी होती. शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले माजी आमदार श्रीकांत देशपांडे, भाजपच्या संगीता शिंदे यांनी बंडखोरी करत सरनाईक यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. काँग्रेसकडून रिंगणात असणाऱया आदिती पोहरे यांना दुसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. महायुतीतील बंडखोरीचा फायदा सरनाईक यांना झाल्याची चर्चा आहे.
पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादीची भाजपला धोबीपछाड
पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी स्मिता जाधव यांना पराभूत करत भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला. पुणे पदवीधरची जागा भाजपने खूपच प्रतिष्ठेची केली होती. मागच्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने जिंकलेली असतानाही महायुतीत ही जागा हट्टाने अजितदादा गटाकडून हिसकावून घेतली होती. येथून आमदार राहिलेल्या अरुण लाड आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या शरद लाड यांचा पक्ष प्रवेश करून घेत पुणे पदवीधरची जागा जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावत बडय़ा नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. परंतु या जागेवर राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख यांच्याकडून भाजपच्या स्मिता जाधव यांना धक्कादायक पराभव झाला.
नागपूरमध्ये अटीतटीच्या लढाईत काँग्रेसची सरशी
नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसग्रेस-भाजपात अटीतटीची लढाई झाली. काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेत भाजपला चांगलाच घाम पह्डला. दुसऱया फेरीत भाजपच्या सुधाकर कोहळे यांनी निसटती आघाडी घेतली. त्यातच राष्ट्रवादीचे बंडखोर नितेश कराळे यांनी लक्षणीय मते घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली. 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वंजारी यांनी या मतदारसंघात असणारी भाजपची मत्तेदारी मोडून काढत विजय खेचून आणला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपीच असलेली ही जागा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळवायचीच असा चंग भाजपने बांधला होता. पण काँग्रेसच्या वंजारी यांनी शेवटपर्यंत कडवी झुंज देत दुसऱयाच पसंतीची मते मिळवत विजय मिळवला.
विजयी उमेदवार
- पुणे पदवीधर – हर्षदा देशमुख (राष्ट्रवादी)
- संभाजीनगर – डॉ. प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी)
- नागपूर – अभिजित वंजारी (काँग्रेस)
- पुणे शिक्षक काैस्तुभ गावडे (भाजप)
- अमरावती – किरण सरनाईक (शिंदे गट)
पुणे शिक्षकमध्ये भाजपची शिंदे गटावर मात
पुणे पदवीधर मतदार संघाप्रमाणे पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे काैस्तुभ गावडे यांनी येथून विजय मिळवत शिंदे गटाच्या सचिन सानप यांच्यावर मात केली. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाटय़ाला गेली असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाचे बंडखोर सचिन सानप यांच्यामागे ताकद उभी करत आव्हान उभे केले होते. काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत भाजपच्या काैस्तुभ गावडे यांनी शिंदे गटाच्या सचिन सानप यांच्यावर मात केली. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना तिसऱया तर काँग्रेसग्रेस उमेदवार जयंत आसगावकर यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पाचही मतदारसंघांत मॅरेथॉन मतमोजणी
मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. 35 तासांनंतर पुणे शिक्षक, पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाले. रात्री उशिरा नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरचे निकाल जाहीर झाले.
पाचही मतदारसंघांत विजयासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आला नाही.
दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागल्याने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन विजयी उमेदवाराच्या घोषणेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली.
Comments are closed.