खोट्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी पोलिसांनी पंधरा कोटी मागितल्याचा आरोप, गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याचे वसई-विरार पोलीस आयुक्तांचे आदेश
विरारमधील प्रसिद्ध व्यावसायिक आणि निदान हेल्थ केअरचे संचालक डॉ. नितीन थोरवे यांच्यावर वसई-विरार पोलिसांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयाने हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत स्थगिती दिली आहे. या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पोलिसांनी पंधरा कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप डॉ. थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यानंतर वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाची गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. नितीन थोरवे यांनी २००९ मध्ये दहिसर येथील मैत्री कुटुंबीयांसोबत विरारमधील एका जागेचा व्यवहार केला होता. थोरवे यांनी मैत्री कुटुंबीयांना ६६ लाख रुपये दिले होते. जुलै २०२६ मध्ये मैत्री यांनी थोरवे यांच्या विरोधात २० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सर्व व्यवहार झालेले असताना अचानक हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने डॉ. थोरवे यांना धक्का बसला. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याने पोलिसांनी हा गुन्हा खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग केला होता. यामुळे थोरवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मैत्री कुटुंबीयांना दिलेले रकमेचे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे न्यायालयाने हा खोटा गुन्हा असल्याचे सांगत स्थगिती दिली.
गुन्हा दाखल केल्याच्या रागातून आरोप
गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे आदींनी वारंवार संपर्क साधून प्रकरण मिटवण्यासाठी १५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप डॉ. थोरवे यांनी केला. या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे चौकशी सोपवली आहे. हा गुन्हा खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. माझा तपासाशी काही संबंध नाही, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी यांनी सांगितले. मी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून डॉ. थोरवे आरोप करत आहेत, असेही दळवी यांनी सांगितले.
Comments are closed.