अंतिम फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानचे संघ सज्ज; पुरुष संघाची बांगलादेशशी तर महिलांची श्रीलंकेशी गाठ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अननुभवी आणि दुबळ्या संघामुळे अत्यंत एकतर्फी झालेल्या कॉमनवेल्थ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात हिंदुस्थानी पुरुष संघाने श्रीलंकेचा 45-24 असा धुव्वा उडवत विजयी षटकार खेचला. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानी पुरुषांना बांगलादेशशी भिडावे लागणार आहे तर महिला संघाची गाठ श्रीलंकेशी पडेल. पुरुष गटात दुसरी उपांत्य लढत केनिया- श्रीलंका आणि युगांडा-केनिया अशी होईल.

गेले आठवडाभर वीर सावरकर क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धरून-पकडून आणलेल्या खेळाडूंमुळे पुरूष गटात रंगलेले 36 पैकी 36 सामने एकतर्फी झाले तर महिला गटातील 20 सामन्यापैकी श्रीलंका-केनिया (23-20) सामना वगळता सर्व सामने कंटाळवाणे झाले. आज साखळी सामन्यांच्या शेवटच्या दिवशी झालेल्या पुरुष गटाच्या लढतीत टांझानियाने इंग्लंडचा (36-27), युगांडाने नायजेरियाचा (72-29), कॅनडाने सिंगापूरचा (45-38), केनियाने ऑस्ट्रेलियाचा (76-27) धुव्वा उडवला. हिंदुस्थानने पंकज मोहितेच्या तुफानी चढायांच्या जोरावर उपांत्य फेरी गाठलेल्या श्रीलंकेवर सहज मात केली. सलग पाच विजय मिळवणाऱया श्रीलंकेचा हा पहिलाच पराभव ठरला आहे.

हिंदुस्थानचे दोन्ही गटातील जेतेपद निश्चित मानले जात आहे. या स्पर्धेच्या दोन्ही गटात हिंदुस्थानसह श्रीलंका आणि केनिया या संघांनीही उपांत्य फेरी गाठली आहे. पुरुष गटातील संघ इतके कमकुवत आहेत की हिंदुस्थान विरुद्ध केनिया अशी अंतिम लढत होणार हे निश्चित आहे. मात्र महिलांच्या उपांत्य फेरीत केनिया आणि श्रीलंका यांच्यात पुन्हा थरारक लढत होण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील एकमेव अटीतटीची लढत यांच्यातच रंगली होती. त्यामुळे जेतेपदासाठी हिंदुस्थानविरुद्ध कोण भिडेल, याचा अंदाज लावणे तूर्तास कठीण आहे.

महिला गट उपांत्य लढत

केनिया वि. युगांडा ६.००

हिंदुस्थान वि. श्रीलंका       6.45

पुरुष गट उपांत्य लढत

केनिया वि. श्रीलंका          8.00

हिंदुस्थान वि. बांगलादेश   9.00

Comments are closed.