रणजी राऊंडअप – विदर्भाची विजयी हॅटट्रिक
विदर्भाने नागपूरमध्ये गोव्याला एक डाव आणि 27 धावांनी पराभूत करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. पहिल्या डावात 8 बाद 442 धावांवर डाव घोषित केल्यानंतर विदर्भाने गोव्याचा पहिला डाव 220 धावांत संपुष्टात आणला, तर दुसरा डाव 195 धावांत संपवत डावाने विजय नोंदवला.
मध्य प्रदेशचा डावाने विजय
मध्य प्रदेशने बिहारला एक डाव आणि 174 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. बिहारचा पहिला डाव 99 धावांवर गुंडाळल्यानंतर मध्य प्रदेशने 8 बाद 407 धावा करून डाव घोषित केला. मग बिहारचा दुसरा डावही 134 धावांत गारद झाला
जम्मू–कश्मीरची झुंज
पहिल्या डावात 616 धावांचा डोंगर उभारणाऱया बडोद्याने जम्मू-कश्मीरचा डाव 303 धावांत संपवून त्यांच्यावर फॉलोऑन लादला, मात्र दुसऱया डावातही जम्मू-कश्मीरने झुंज देत 6 बाद 316 धावा करत बडोद्याला विजयापासून दूरच ठेवले.
आसामच्या मनगटावर भूत
आसामने पहिल्या डावात 281 धावा केल्या तर सौराष्ट्रने 387 धावा करत 106 धावांची आघाडी घेत आसामला फलंदाजी दिली. तेव्हा पार्थ भूतची फिरकी आसामच्या मानगुटीवर बसली आणि त्याने आसामचा डाव अक्षरशः 94 धावांत उखडला आणि डावाने विजय मिळवला. भूतने 18 षटकांतील 10 षटके निर्धाव टाकत 17 धावांत 8 विकेट टिपण्याचा पराक्रम केला.
कर्नाटकचा अखेर विजय
त्रिपुराच्या 194 धावांनंतर कर्नाटकने 9 बाद 490 धावांवर डाव घोषित करत 296 धावांची प्रचंड आघाडी घेतली. मग त्रिपुराचा दुसरा डाव 180 धावांवर गुंडाळून आपल्या डावाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Comments are closed.