विधान परिषदेच्या निकालावरून महायुतीत दिवाळीआधीच फटाके; शिंदे गटाने ‘दगाफटका’ केल्याचा भाजपचा आरोप! पक्षांतर्गत असंतोष व अंतर्गत बंडखोरीमुळे घात
विधान परिषद निवडणुकीत पाचपैकी केवळ दोनच जागांवर सत्ताधाऱयांना समाधान मानावे लागले. यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला असून महायुतीत दिवाळीआधीच फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. पुणे आणि नागपूरमध्ये शिंदे गटाने ‘दगाफटका’ केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे, तर पक्षांतर्गत असंतोष आणि बंडखोरीमुळे तुम्हीच तुमचा घात केल्याचा पलटवार शिंदे गटाने केला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचच्या पाच जागा जिंकण्याचा दावा महायुतीकडून केला जात होता, पण या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने महायुतीमधील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. पुणे आणि नागपूरमध्ये शिंदे गटाने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात उघड उघड भूमिका घेतली होती, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याचा फटका महायुतीला बसल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
रवींद्र चव्हाण दिल्लीत अहवाल देणार
निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः नागपूर आणि पुण्यातील कामगिरीचा आढावा घेणार आहेत. निवडणूक व्यवस्थापन, जिल्हाध्यक्षांची कामगिरी तसेच आमदार आणि मंत्र्यांची भूमिका तपासून दिल्लीत अहवाल देणार आहेत. यासाठी चव्हाण 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षाने आततायीपणा थांबवावा – दरेकर
महायुतीत राहायचे आणि पाठीत खंजीर खुपसून आमचेच पाय तोडायचे, हा ‘शेखचिल्ली’सारखा मूर्खपणा चालणार नाही. महायुतीची गरज सर्वांनाच आहे. त्यामुळे मित्रपक्षाने आततायीपणा थांबवून समन्वय राखावा, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले.
भाजप महाराष्ट्र उपाध्यक्षांचा घरचा आहेर
‘पाच जागांच्या निकालानंतर तरी महायुती म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का? एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोनवर का थांबलो?’ अशी पोस्ट करत भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
सतीश चव्हाणांचे साम्राज्य संपविण्यात माझा खारीचा वाटा -ः अब्दुल सत्तार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 18 वर्षे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांनी कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचे साम्राज्य संपवण्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात माझा खारीचा वाटा आहे. नागपूर पदवीधरमध्ये आम्ही भाजपला पूर्ण सहकार्य केले होते, मात्र निवडणुकीत पराभव झाला की, कोणाच्या तरी डोक्यावर खापर पह्डण्यासाठी कारणे शोधावी लागतात, असा टोला शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
सरकारवर नाराजी दिसते तेव्हा अशा गोष्टी घडतात – धंगेकर
लोकशाहीत जनतेचा काwल मान्य करावा लागतो. मतदारांमध्ये सरकारविषयी नाराजी दिसते. सरकारच्या कामकाजाबाबत संशय उपस्थित होतो तेव्हा अशा गोष्टी घडतात. त्यामुळे भाजपने शिंदे गटावर खापर फोडणं चुकीचं आहे. उमेदवारांची चुकीची निवड आणि त्यांच्याच पक्षातील असंतोषामुळे हा घात झाल्याचा पलटवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
Comments are closed.