सौदीत अडकले चार हजार हिंदुस्थानी; हुतीच्या हल्ल्यानंतर उड्डाणे ठप्प, परतीचा प्रवास महागला
सौदी अरबमधील उमरासाठी हिंदुस्थानातून गेलेले चार हजारांहून अधिक जण सौदी अरबमध्ये अडकले आहेत. हुती बंडखोरांनी सौदी अरबवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे सौदीतून येणारी उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे या लोकांना हिंदुस्थानात येणे अवघड झाले आहे. उड्डाणे ठप्प आणि परतीचा प्रवास महाग झाल्याने या नागरिकांना आता मायदेशी कसे यावे, असा प्रश्न पडला आहे. सौदीत अडकून पडलेल्या लोकांचा हॉटेल आणि जेवणाचा खर्च वाढत आहे. अनेकांची नियमित औषधेही संपली आहेत.
रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुती हल्ल्यानंतर उड्डाणे प्रभावित झाल्याने त्यांची घरवापसी कठीण झाली आहे. काही यात्रेकरू मक्का-मदिनामध्ये आहेत, तर काही जेद्दाह आणि दमाममध्ये अडकले आहेत. हैदराबादमध्ये राहणारे मोहम्मद हकीम हे सौदीला उमरासाठी गेले होते. त्यांना 30 ऑक्टोबरला हिंदुस्थानात परत यायचे होते. 22 ऑक्टोबर रोजी सौदी एअरलाइनने त्यांना हॉटेलमध्ये थांबवले होते. विमानाचे उड्डाण रद्द झाल्यानंतर दुसऱया ठिकाणी त्यांना नेण्यात आले. त्या ठिकाणी एका खोलीत 10 ते 15 हिंदुस्थानी लोकांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वांना पुरेल असे अंथरूण नाही. स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. गरम पाणीही मिळत नाही. सोबत वृद्ध, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण आहेत. औषधे संपली आहेत, त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी फोन करून कुटुंबातील व्यक्तींना सांगितले आहे.
Comments are closed.