वृद्धापकाळात झोप कमी होतेय? झोपेच्या सवयींमध्ये करा हे बदल

वय वाढू लागलं की अनेक गोष्टींमध्ये बदल जाणवू लागतात. पूर्वी रात्री डोकं टेकवलं की लगेच झोप लागायची; पण आता मात्र मध्यरात्री जाग येणं, पहाटेच झोप उडणं किंवा रात्रभर अस्वस्थ वाटणं असे अनुभव अनेक ज्येष्ठांना येतात. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो आणि चिडचिडही वाढू शकते. मात्र, वृद्धापकाळात झोपेच्या पद्धतीत बदल होणं सामान्य असलं तरी पुरेशी आणि चांगल्या दर्जाची झोप मिळणं तितकंच महत्वाचं आहे.

चांगल्या झोपेसाठी करा हे बदल:

झोपण्याची वेळ ठरवा: दररोज रात्री एकाच वेळी झोपण्याचा आणि सकाळी ठरलेल्या वेळी उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराचं झोपेचं वेळापत्रक नियमित राहण्यास मदत होते.

दिवसा जास्त झोपू नका: दुपारी थोडी विश्रांती घ्या; मात्र दीर्घकाळ झोपल्यास रात्री झोप येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

चहा-कॉफी टाळा: संध्याकाळनंतर चहा, कॉफी यांसारखी कॅफिनयुक्त पेयं घेणं टाळा.

हलका व्यायाम करा: सकाळी चालणं, योग किंवा हलके स्ट्रेचिंग केल्याने शरीर सक्रिय राहण्यास मदत होते.

झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळा: मोबाईल, टीव्हीचा वापर कमी करा. त्याऐवजी पुस्तक वाचणं किंवा शांत संगीत ऐकणं पसंत करा.

झोपेच्या सवयी बदलूनही त्रास कायम राहत असेल, घोरणं किंवा श्वास अडखळण्याचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments are closed.