काँग्रेसचा 'लोक महाभियोग' पुढे ढकलला

ज्ञानेश कुमार यांच्यावरील कार्यक्रमाचे आज आयोजन : उद्या रामलीला मैदानावर मोर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी होणारा ‘पार्लमेंट ऑन द रोड्स’ म्हणजेच ‘जन महाभियोग’ हा कार्यक्रम आता शनिवारी होणार आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पावसामुळे आम्ही आजचा कार्यक्रम आता शनिवारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, 1 नोव्हेंबर रोजी आम्ही रामलीला मैदानाकडे मोर्चा काढू, असे राहुल गांधी म्हणाले. या मोर्चासाठी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहनही काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आले.

‘पार्लमेंट ऑन द रोड्स’ या कार्यक्रमाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवला जाणार आहे. सार्वजनिक महाभियोगामध्ये जनता किंवा राजकीय पक्ष घटनात्मक पद धारण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन करतात. त्यानुसार निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील महाभियोगासंबंधी विविध नेते आपली मतमतांतरे व्यक्त करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘मत वाचवा, देश वाचवा’ रॅली काढणार आहे.

पावसामुळे कार्यक्रम पुढे ढकलला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ‘जन महाभियोग’ पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले. दिल्लीतील पावसामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना होणारी गैरसोय गृहित धरून हा कार्यक्रम शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

Comments are closed.