सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना प्रायव्हसीच्या या चुका टाळा
हल्ली सोशल मीडियावर फिरायला गेल्याचे, नवीन वस्तू खरेदी केल्याचे, कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांचे फोटो शेअर करण्याची अनेकांना सवय आहे. मात्र फोटो पोस्ट करताना आपण नकळत काही वैयक्तिक माहितीही जगासमोर आणत असतो. या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो शेअर करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
लोकेशन टॅग
फोटो पोस्ट करताना अनेक जण घर, ऑफिस, शाळा किंवा नेहमी भेट देत असलेल्या ठिकाणाचे लोकेशन टॅग करतात. यामुळे तुमच्या रोजच्या येण्या-जाण्याची माहिती इतरांना मिळू शकते. विशेषतः घराचे अचूक लोकेशन सार्वजनिकपणे शेअर करणे टाळा.
घराचा पत्ता / महत्त्वाची कागदपत्रे
फोटो काढताना मागे घराचा पत्ता, वाहन क्रमांक, कुरिअरवरील लेबल, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे दिसत नाहीत ना, हे तपासा. अशा छोट्या तपशीलांमधून तुमची वैयक्तिक माहिती उघड होऊ शकते.
मुलांचे फोटो
मुलांचे फोटो शेअर करताना त्यांची शाळेची गणवेश, शाळेचे नाव, ओळखपत्र किंवा रोजच्या वेळापत्रकाची माहिती दिसणार नाही याची काळजी घ्या. मुलांचे फोटो कोण पाहू शकते, यासाठी अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग तपासा.
लाईव्ह लोकेशन
तुम्ही सध्या कुठे आहात, किती वेळ बाहेर असणार आहात किंवा घर रिकामे आहे का, याची माहिती सोशल मीडियावरून सहज मिळू शकते. त्यामुळे फिरायला गेल्यानंतर फोटो शेअर करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
प्रायव्हसी सेटिंग
तुमचे सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक आहे की खासगी, तुमचे फोटो कोण पाहू शकते आणि कोण ते शेअर करू शकते, हे वेळोवेळी तपासा. अनोळखी व्यक्तींना फोटो आणि वैयक्तिक माहितीचा अॅक्सेस देऊ नका.
Comments are closed.