ऑनलाइन डेटिंग करताय? पहिल्या भेटीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा!

डिजिटल युगात मैत्री किंवा जोडीदार शोधण्यासाठी अनेक जण ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. सुरुवातीला चॅटिंग, फोन कॉल आणि व्हिडिओ कॉलमधून ओळख वाढते. मात्र ऑनलाइन बोलणं आणि प्रत्यक्ष भेटणं यात फरक असतो. समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे, तिचा स्वभाव कसा आहे आणि ती सांगत असलेली माहिती खरी आहे का, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिल्या भेटीपूर्वी काही गोष्टी तपासल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

प्रोफाइलची सत्यता
समोरच्या व्यक्तीचं प्रोफाइल, फोटो आणि दिलेली माहिती नीट पाहा. फोटो खरे आहेत का, सोशल मीडिया प्रोफाइलशी माहिती जुळते का, याची पडताळणी करा. गरज वाटल्यास व्हिडिओ कॉल करून बोला.

वैयक्तिक माहिती
पहिल्याच काही संवादांमध्ये घराचा पत्ता, ऑफिसचा पत्ता, आर्थिक माहिती, ओळखपत्र किंवा बँकेशी संबंधित तपशील देऊ नका. विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ द्या.

पैशांची मागणी होतेय? सावधान!
समोरची व्यक्ती अचानक आर्थिक अडचण, आपत्कालीन परिस्थिती किंवा भेटण्यासाठी पैसे पाठवण्याची विनंती करत असेल तर सावध व्हा. ऑनलाइन ओळखीच्या व्यक्तीला पैसे पाठवण्याची घाई करू नका.

पहिली भेट ठिकाण
पहिल्या भेटीसाठी कॅफे, रेस्टॉरंट किंवा गर्दीची सार्वजनिक जागा निवडा. अनोळखी व्यक्तीच्या घरी, हॉटेलमध्ये किंवा एकांत ठिकाणी जाणं टाळा. शक्यतो येण्या-जाण्याची व्यवस्था स्वतः करा.

जवळच्या व्यक्तीला माहिती द्या
कुणाला भेटायला जात आहात, कुठे जाणार आहात आणि किती वाजता परतणार आहात, याची माहिती विश्वासू मित्र किंवा कुटुंबीयांना द्या. गरज असल्यास लोकेशन शेअर करा.

वैयक्तिक मर्यादांचा आदर
समोरची व्यक्ती तुमच्या आवडी-निवडी, मतं आणि वैयक्तिक मर्यादांचा आदर करते का, हे लक्षात घ्या. सतत दबाव टाकणं, खासगी फोटो मागणं किंवा नको असलेल्या गोष्टींसाठी आग्रह करणं ही धोक्याची चिन्हं असू शकतात.

मनात शंका असल्यास…
समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात विसंगती जाणवत असेल किंवा काहीतरी चुकीचं वाटत असेल तर भेटण्याचा निर्णय पुढे ढकला. केवळ समोरच्याला वाईट वाटेल म्हणून स्वतःला असुरक्षित परिस्थितीत टाकू नका.

Comments are closed.