परीक्षण – पहिले महानुभावीय आत्मकथन

>> पाऊस ठोंबरे

महानुभाव पंथाने मराठी साहित्याला आद्यग्रंथ दिला. पुढे साडेसहा हजार ग्रंथांची भर टाकली, पण ते सर्व वाङ्मय सांकेतिक लिपीत बद्ध असल्याने वाचकांसमोर येण्यास खूप विलंब लागला. त्यामुळे साडेसातशे वर्षे हा पंथ अबोल राहिला, स्वतःला लपवत राहिला. या पार्श्वभूमीवर बा. भो. बाभूळगावकर शास्त्री यांनी लिहिलेली ‘मार्गस्थ’ ही आत्मकथा एक ऐतिहासिक घटना आहे. ही पंथातील एका महंताने लिहिलेली पहिलीच आत्मकथा असून मौनाची गुपिते उलगडणारी आहे.

पहिल्या भागात शास्त्रीजींचा पूर्वार्ध आला. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे सरभर झालेले जीवन, वयाच्या सतराव्या वर्षी झालेली अक्षरांची ओळख, वारकरी पार्श्वभूमीतून महानुभाव पंथात झालेला प्रवेश. दुसऱ्या भागात पंथातील आश्रमव्यवस्था, महंती, झेंडा, लघुचिंतनी, महाचिंतनी, भेटकाळसारख्या लुप्त होत चाललेल्या परंपरा, कीर्तन परंपरा रुळवण्याचा प्रयत्न आणि पंथातल्या गट-तटाच्या राजकारणाचे प्रांजळ दर्शन घडले.

आता या तिसऱ्या भागात याच संघर्षाच्या एकसूत्रीपणाचा अलिखित संदेश आपल्या जगण्याला कसा पोषक असू शकतो, हे मर्म बा. भो. शास्त्री उलगडतात. वारकरी आणि महानुभाव हे दोन प्रवाह वेगळे वाटत असले तरी त्यांच्या एकसूत्रीपणातूनच मानवी जगणं समृद्ध होतं, हा विचार ते मांडतात. या भागात दोन तीव्र भावना एकाच वेळी उसळून आल्या आहेत. एकीकडे एका सुवर्णपर्वाचा अंत होताना पाहणे आणि दुसरीकडे विद्येची बुडू पाहणारी नौका नव्या पिढीने वाचवावी ही अभिलाषा. या दोन टोकांमधली ही आत्मकथा केवळ व्यक्तीची कथा राहत नाही, तर ती एका संपूर्ण पंथाच्या स्थित्यंतराची आणि समाजाच्या मानसिकतेची नोंद बनते.

‘जेव्हा आपण प्रसादात अभयाचं रसतत्त्व मिसळू तेव्हाच जगात प्रसन्नता निर्माण होईल’ या विचारातून शास्त्रींना देवातली माणसं आणि प्रसादातलं अभय लाभलं. अनेक साहित्यिकांच्या, ज्ञाननिष्ठ महंतांच्या व विचक्षण रसिकांच्या सहवासाने त्यांचा हा वाङ्मयीन प्रवास न्हाऊन निघाला आहे. आपले अनुभव मांडण्यासाठी शब्द हात जोडूनच त्यांच्यासमोर विनम्रपणाने उभे झालेले आहेत. वाङ्मयाची ही सेवा करताना त्यांनी शब्दांशी केवळ खेळ केला नाही, तर शब्दांना जगण्याचा अर्थ दिला आहे.

परमेश्वरमार्ग स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे क्रांतिकारी निर्णय लोकसमूहांवर प्रश्नांच्या ढगांसारखे कोसळले, लीळाचरित्रावरून निर्माण झालेले पंथातले अंतर्गत वादळ कर्मयोग्यांनाही पंथीय वाटेवर जखमी करीत राहिले, याची व्यथा इथे आहे. अधिवेशन असो की राजकारण असो, या प्रत्येक घटनेतून शास्त्राr एकच गंभीर संदेश देतात – अहंचे विसर्जन आवश्यक असते, तेव्हाच माणसाचे पाय मातीवर टेकतात. जिथे अहंकार संपतो तिथेच खरी महंती सुरू होते, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. हाच संदेश त्यांनी चिंतनीच्या निमित्ताने परत वरझडीला दिला आणि शेवटी विमानाने नागपूरला येऊन भंडाऱ्याच्या कार्यक्रमात पोहोचूनच हा मार्गस्थ इथे थांबला आहे.

या पुस्तकाची खरी ताकद त्याच्या प्रकरणांमध्येच आहे. कृष्ण सांगतो कृष्ण होऊनि कृष्णाची कथा या महानुभावीय तत्त्वाने सुरुवात होते. अहंतेच्या जमिनीवर महंतीचं आसन नसावं आणि महावाक्य विवरावेमधून ते अहंकार विसर्जनाचा मार्ग सांगतात. सज्जनांचा अबोला आणि उपाधींची पुटं, महाचिंतनी आणि दानशूर कुडव, समाजाची माय, सहवास, कीर्तन बहीण आणि ताटीचे अभंग या प्रकरणांतून त्यांच्या व्यापक जनसंपर्काची ओळख होते.

या ग्रंथाचे दोन आधारस्तंभ म्हणजे खर्चिक दसवे सप्ताह आणि विचारांचा लढा व महानुभावीय कीर्तन वरझडीचे दत्तमंदिर. एकीकडे देणगीचा पारदर्शक हिशेब आणि दुसरीकडे निसर्गात धर्म ओतण्याच्या मोठय़ा स्वप्नाची बीज-रचना. त्यानंतरचा प्रवास म्हणजे दत्तगडाची प्रत्यक्ष निर्मिती – दत्तगडचा जन्म निसर्गात धर्म ओतण्याचा प्रयत्न, उभारणीत अनेकांचे हात अनाकलनीय अनुभव, चिंतनी दत्तगडचे सौंदर्य आणि दुश्चित्तांची भेदनीती, सज्जनांचे सज्जनत्व, ग्रामविकास मंदिर आणि आत्मपरीक्षण, दत्तगडवरील प्रवास शापित होऊ लागला, भूमिदान व औदार्य आणि शेवटी मनातला दत्तगड आणि समारोप.

आत्मचरित्रकार बा. भो. शास्त्री हे साहित्यिक-कलावंत आहेत. कलावंत हा अंधार उजळण्यासाठी जगणारा जागल्या असतो. मानवी जीवनातील सौंदर्याची कोणी तोडफोड करू नये म्हणून तो डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतो. कलावंताला जात, धर्म, पंथ, पक्ष, भाषा, देश यांच्या सीमारेषेत अडकून पडता येत नाही. तो या सर्व चौकटीपल्याडचा विचार करणारा वैश्विक चिंतनात चिंब भिजलेला दुनियेचा सन्माननीय नागरिक असतो. शास्त्रीजी असे साहित्यिक आहेत की जे पंथीय चौकटीत अडकून न पडता वस्तुनिष्ठपणे विचार मांडतात. त्यांची प्रज्ञा प्रतिभा या मार्गस्थमधून शांत तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे उजळून गेली आहे.

हा तिसरा भाग म्हणजे केवळ आत्मकथा नाही, तर फाटत चाललेलं माणूसपण सांधण्याचा आणि निसर्गात धर्म ओतण्याचा प्रयत्न आहे.

मार्गस्थ (भाग तिसरा)

लेखक: बा. अहो. शास्त्रज्ञ

पृष्ठेः 250

Comments are closed.