रग्बीच्या महासत्तेला हिंदुस्थानी मुलींचा हादरा! न्यूझीलंडच्या माओरी युवा संघाला 17-0 ने लोळविले
रग्बीच्या मैदानावर न्यूझीलंडचा दबदबा असून, पुरुष संघाने तीन, तर महिला संघाने सहा विश्वचषक जिंकले आहेत. अशा रग्बी महासत्तेच्या युवा खेळाडूंना हिंदुस्थानी मुलींनी धूळ चारली आहे. बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे २७ ऑक्टोबरला झालेल्या रग्बी सेव्हन्सच्या सामन्यात हिंदुस्थानच्या २० वर्षांखालील महिला संघाने न्यूझीलंडच्या युवा माओरी संघाचा १७-० असा धुव्वा उडवला. हिंदुस्थानी मुलींच्या या कामगिरीने रग्बीविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
हिंदुस्थानविरुद्ध मैदानात उतरलेला संघ हा न्यूझीलंडमधील विविध भागांतून निवडलेल्या माओरी समाजातील २४ युवा खेळाडूंचा निमंत्रित संघ होता. हिंदुस्थान-न्यूझीलंड क्रीडा संबंधांना १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही मालिका आयोजित करण्यात आली.
या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पारंपरिक १५ खेळाडूंच्या रग्बीचा नव्हे, तर रग्बी सेव्हन्सचा होता. या प्रकारात प्रत्येक संघाचे सात खेळाडू मैदानात उतरतात. सामना प्रत्येकी सात मिनिटांच्या दोन सत्रांत खेळला जातो. त्यामुळे वेग, चपळता, अचूक पासिंग, टॅ कलिंग आणि क्षणार्धात रणनीती बदलण्याची क्षमता महत्त्वाची ठरते.
पारंपरिक रग्बीचा सामना ८० मिनिटांचा असतो. त्यामुळे या विजयाची तुलना थेट १५ खेळाडूंच्या रग्बीतील सामर्थ्याशी करता येणार नाही. मात्र, हिंदुस्थानी मुलींच्या कामगिरीचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. पहिल्या सत्रातच १२-० अशी आघाडी घेत हिंदुस्थानने सामन्यावर पकड मिळवली. दुसऱ्या सत्रातही न्यूझीलंडच्या खेळाडूंना हिंदुस्थानी बचावफळी भेदता आली नाही. अखेर हिंदुस्थानने १७-० अशी बाजी मारली.
Comments are closed.