पंख्याच्या आवाजाशिवाय झोप लागत नाही? यामागे कारण काय?

अनेकांना रात्री झोपताना पंखा किंवा कूलर सुरू असल्याशिवाय झोप लागत नाही. विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांतही काही जण पंखा सुरू ठेवूनच झोपणे पसंत करतात. पंखा बंद झाला किंवा अचानक त्याचा आवाज थांबला की अनेकांची झोपमोड होते. तुम्हालाही असा अनुभव येतो का? यामागे नेमके कारण काय आहे हे जाणून घेऊया

आवाजाची सवय

मेंदू आजूबाजूला होणाऱ्या प्रत्येक आवाजाची नोंद घेत असतो. मात्र, एखादा आवाज सतत ऐकण्याची सवय झाली की मेंदू त्याकडे दुर्लक्ष करू लागतो. उदाहरणार्थ, दररोज पंखा सुरू ठेवून झोपणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांनी त्याचा आवाज जाणवेनासा होतो. मानसशास्त्रात या प्रक्रियेला हॅबिच्युएशन असे म्हणतात. त्यामुळे पंख्याचा आवाज त्रासाचा न वाटता सवय बनतो.

बाहेरील आवाजांचा त्रास कमी

रात्री शांत वातावरणात एखाद्या वाहनाचा हॉर्न, कुत्र्याचे भुंकणे किंवा बाहेरचा मोठा आवाज सहज ऐकू येतो. मात्र, पंखा किंवा कूलर सुरू असेल तर त्याच्या सततच्या आवाजामुळे बाहेरचे अचानक होणारे आवाज कमी जाणवू शकतात. या प्रक्रियेला साउंड मास्किंग म्हणतात. त्यामुळे काही लोकांना शांत झोप लागते.

पंख्याचा आवाज बनतो झोपेचा संकेत

दररोज रात्री एकाच वातावरणात झोपण्याची सवय असेल तर मेंदू त्या वातावरणाचा संबंध झोपेशी जोडू शकतो. यालाच क्लासिकल कंडिशनिंग म्हणतात. त्यामुळे पंख्याचा आवाज ऐकताच मेंदूला झोपण्याची वेळ झाली आता झोपायचे आहे असा संकेत मिळतो.

पंखा बंद झाला की झोप का मोडते?

अचानक पंखा बंद झाल्यास वातावरणात एकदम शांतता पसरते किंवा हवेची दिशा बदलते. ही अचानक झालेली बदलाची जाणीव आपल्या मेंदूला होते, ज्यामुळे विशेषतः हलकी झोप सुरू असताना पटकन जाग येते.

लक्षात ठेवा

पंख्याचा आवाज प्रत्येकासाठी झोपेचा संकेत असेल असे नाही. काही लोकांना शांत वातावरणात चांगली झोप लागते, तर काहींना एकाच आवाजाची सवय होते.

हेही वाचा – सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना प्रायव्हसीच्या या चुका टाळा

Comments are closed.