हिंदुस्थानी खेळाडूंचा दुहेरी धमाका, राष्ट्रकुल कबड्डी स्पर्धेत पुरुष अन् महिला गटात विजेतेपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यजमान हिंदुस्थानने राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत दणकेबाज कामगिरी करत दुहेरी विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेला पळता भुई थोडी करत 54-20 असा दणदणीत विजय साकारला. महिलांच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानने युगांडाचा 35-15 असा सहजपणे फडशा पाडला.

अंतिम सामन्यात हिंदुस्थानी खेळाडूंनी श्रीलंकेला अक्षरशः निप्रभ केले. आदित्य शिंदेने 14 चढायांमध्ये 10 गुणांची कमाई करत सुपर टेनची चमक दाखवली. भरत हुड्डाने उत्तरार्धात आठ गुणांची भर घातली. पंकज मोहितेने सहा, तर उपकर्णधार नवीन कुमारने पाच गुण मिळवले. संरक्षणात योगेश दहियाने पाचपैकी पाच यशस्वी पकडी करत ‘हाय-फाईव्ह’ नोंदवला. हिंदुस्थानी बचावपटूंनी श्रीलंकेच्या चढायांना वेसण घालताना प्रतिस्पर्ध्यांना चार वेळा सर्वबाद केले. विशेष म्हणजे, हिंदुस्थानला एकदाही सर्वबाद होण्याची नामुष्की पत्करावी लागली नाही. पहिल्या सत्रात हिंदुस्थानने 30-10 अशी भक्कम आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली. उत्तरार्धातही 24-10 अशी बाजी मारत हिंदुस्थानने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेच्या चढाईपटूंना हिंदुस्थानी बचाव भेदता आला नाही. त्यांनी 41 चढायांमध्ये अवघे सात गुण मिळवले.

Comments are closed.