किवींचा शेवट गोड, मालिकेवर हिंदुस्थानचा कब्जा; पाचव्या सामन्यात सलग दुसरा पराभव, पण मालिका 3-2 ने जिंकली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पहिल्या तीन सामन्यांत हिंदुस्थानसमोर सपशेल शरणागती पत्करल्यानंतर न्यूझीलंडने अखेरच्या दोन सामन्यांत विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला. मात्र विजयाच्या हॅटट्रिकसह टीम इंडियाने आधीच मालिका जिंकलेली होती. पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 7 विकेट राखून पराभव केला, मात्र मालिका हिंदुस्थानने 3-2 अशी जिंकली. टीम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांच्या तुफानी फलंदाजीपुढे हिंदुस्थानी गोलंदाजांचा निभाव लागला नाही. 4 विकेट टिपणारा ऍडम मिल्ने सामन्याचा मानकरी ठरला, तर ‘मालिकावीरा’चा बहुमान ग्लेन फिलिप्सला मिळाला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकांत 8 विकेट गमावून 191 धावसंख्या उभारली. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. किशनने 32 चेंडूंत 5 षटकार व 5 चौकारांसह 61 धावा ठोकल्या, तर अय्यरने अवघ्या 22 चेंडूंत 4 षटकार व 3 चौकारांसह अर्धशतक झळकावले. दोघांनी अवघ्या 7 षटकांत 93 धावांची भागीदारी केली. त्यामुळे हिंदुस्थानची धावसंख्या 112 पर्यंत पोहोचली.

मात्र या धडाकेबाज भागीदारीनंतर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी हिंदुस्थानच्या फलंदाजीला लगाम घातला. ऍडम मिल्नेने चार षटकांत 19 धावा देत चार विकेट टिपल्या. नॅथन स्मिथ आणि ब्लेअर टिकनर यांनीही 2-2 महत्त्वाचे बळी मिळवत हिंदुस्थानला 191 धावांवर रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.

फिलिप्सचा सर्वाधिक धावांचा विक्रम

फिलिप्सने या मालिकेत एकूण 341 धावा करत द्विपक्षीय टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. हिंदुस्थानी गोलंदाजांना सेफर्ट आणि फिलिप्स यांच्या फटकेबाजीला रोखण्यात अपयश आले. परिणामी, न्यूझीलंडने अखेरच्या सामन्यात हिंदुस्थानला धक्का दिला. मात्र पहिले तीन सामने जिंकणाऱया हिंदुस्थानने मालिका 3-2 अशी खिशात घातली.

सेफर्टला जीवदानाचा फायदा

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातही अडखळत झाली, मात्र टीम सेफर्टला एक जीवदान मिळाले आणि त्याने हिंदुस्थानी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. सेफर्टने 50 चेंडूंत 93 धावांची वादळी खेळी करताना 11 चौकार व 5 षटकारांचा घणाघात केला. त्याला ग्लेन फिलिप्सने 38 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 65 धावांची साथ दिली. दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे न्यूझीलंडने अवघ्या 17.1 षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात 195 धावा करत विजय मिळविला. हिंदुस्थानकडून अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती व नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

Comments are closed.