भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी न्यूझीलंडला मोठा झटका! किवी संघाचे दोन खेळाडू बाहेर
न्यूझीलंडने भारताविरुद्धचे शेवटचे दोन टी२० सामने जिंकले असले, तरी मालिका मात्र भारताने जिंकली आहे. आता दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, जी ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेआधी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडले आहेत.
रवींद्र आणि चॅपमन हे दोघे टी२० मालिकेतही खेळू शकले नव्हते. पाच सामन्यांच्या त्या मालिकेत न्यूझीलंड २-३ असा पराभूत झाला होता. युरोपियन टी२० प्रीमियर लीगदरम्यान चॅपमनला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या एका निवेदनानुसार, नुकतेच झालेल्या एमआरआय स्कॅननंनतर चॅपमनला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रवींद्रलाही खांद्याची दुखापत झाली असून त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी अधिक वेळ लागेल.
दोन प्रमुख खेळाडू आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, “रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन हे किती दर्जेदार खेळाडू आहे, हे सर्वांनाच माहित आहे आणि त्यांना ही मालिका चुकवावी लागत आहे, हे दुर्दैवी आहे.”
“मी गेल्या आठवड्यात मार्कला भेटलो होतो, तो निराश असून मैदानावर परतण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. रचिनचा खांदाही अजून फिल्डींग करण्याइतका ठीक झालेला नाही. तसेच या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही, असेही वॉल्टर पुढे म्हणाले आहेत.
किवी संघातील बदल
टिम सेफर्टचा पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. शेवटच्या दोन सामन्यांसाठी त्याला आधीच निवडले गेले होते. याचा अर्थ तो संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध आहे.
त्याचबरोबर हेन्री निकोल्सचा पहिल्या तीन सामन्यांसाठी, तर डीन फॉक्सक्रॉफ्टचा शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजी मॅट फिशरलाही पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता. याआधी त्याला केवळ शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात घेतले होते, आता मात्र तो संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध आहे.
Comments are closed.