मतदार फॉर्म 6 भरू शकतील

नावे नसलेल्यांसाठी निवडणूक आयोगाची मुभा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ज्या वैध मतदारांची नावे एसआयआय प्रक्रियेत काही कारणांमुळे वगळली गेली असतील, अशा मतदारांना फॉर्म क्रमांक 6 भरुन त्यांची नावे मतदारसूचीत समाविष्ट करता येतील, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे वैध पण वगळले गेलेल्या मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मुभा त्यांना असल्यासंबंधी वक्तव्य केले आहे.

फॉर्म क्रमांक 6 हा, ज्यांना प्रथमच त्यांचे नाव मतदारसूचीत समाविष्ट करायचे आहे, त्यांच्यासाठी आहे. तथापि, ज्या मतदारांची नावे पूर्वी मतदारसूचीत होती, पण आता एसआयआर प्रक्रियेच्या अंतर्गत ती वगळण्यात आली आहेत, अशा मतदारांनाही ही फॉर्म क्रमांक सहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांना ही एक महत्वाची संधी मिळाली आहे. हे मतदार फॉर्म क्रमांक सहा भरुन देऊन, त्यासह आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन आपण वैध मतदार आहोत, हे सिद्ध करु शकतात आणि त्यांची वैधता पडताळणीनंतर सिद्ध झाल्यास त्यांचे नाव मतदारसूचीत पुन्हा समाविष्ट केले जाऊ शकते, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

कारवाई नाही होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला हा निर्णय सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना कळविला आहे. पूर्वी मतदार असणाऱ्या ज्या मतदारांची नावे एसआयआरमध्ये वगळली गेली असतील, त्यांना फॉर्म क्रमांक सहा सादर करता येईल. मात्र, त्यासाठी काही अटी आहेत. अशा मतदारांचे नाव मतदारसूचीत एसआरआरच्या प्रक्रियेअंतर्गत आधीच समाविष्ट झालेले नसावे. तसेच त्यांचे नाव अन्य कोणत्याही विधानसभा मतदारसंघात किंवा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट केलेले नसावे. तसेच, अशा मतदारांनी त्यांची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची वैधता तपासूनच त्यांचे नाव समाविष्ट होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. ज्यांचे फॉर्म क्रमांक सहा आणि कागदपत्रे वैध सिद्ध होतील, त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुच्छेद 31 प्रमाणे कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. मात्र, या सवलतीचा दुरुपयोग करुन पुन्हा नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मतदारांवर मात्र कारवाई केली जाण्याची शक्यता आहे, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.