भारत-श्रीलंका पहिला वनडे दिल्लीबाहेर हलवण्याची DDCA ची BCCI कडे विनंती! जाणून घ्या नेमकं कारण

आगामी काळात भारतीय संघ श्रीलंका विरूद्ध 3 (Odi series between IND vs SL) सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, विशेषतः नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांत नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) एक महत्त्वाची मागणी केली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील सामना दिल्लीबाहेर हलवण्यात यावा, अशी विनंती DDCA ने केली आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात 13 ते 19 डिसेंबरदरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. मात्र, वाढतं प्रदूषण आणि स्टेडियममध्ये सुरू असलेलं नूतनीकरणाचे काम लक्षात घेता हा सामना दिल्लीबाहेर आयोजित करण्याची मागणी दिल्ली क्रिकेट बोर्डाने केली आहे.

रिपोर्ट्स नुसार, DDCA ने BCCI समोर ही मागणी मांडली आहे. दिल्ली क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे की, प्रदूषण हे एक मोठे कारण आहे. त्याचबरोबर स्टेडियममध्ये नूतनीकरणाचे कामही सुरू आहे. त्यामुळे आम्ही बीसीसीआयला हा सामना दिल्लीबाहेर हलवण्याची विनंती केली आहे.

मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वनडे मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेतील एकही सामना दिल्लीत आयोजित करण्यात आलेला नाही.

यापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये दिल्लीच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी प्रदूषणामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना मैदानावर खेळताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. काही खेळाडूंना उलट्यांचाही त्रास झाला होता. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी दिल्ली क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील आहे.

भारत-श्रीलंका वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिला वनडे सामना : 13 डिसेंबर – दिल्ली

दुसरा वनडे सामना : 16 डिसेंबर – बंगळुरू

तिसरा वनडे सामना : 19 डिसेंबर – अहमदाबाद

Comments are closed.