अक्कलकोटला देव दर्शनाहून परतताना भीषण अपघात, 8 वर्षांच्या पार्थसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
घराघरांत दिवाळीच्या सणाची तयारी सुरू असताना एका कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला. दिवाळीची खरेदी आणि देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या भारंबे कुटुंबाचा प्रवास भीषण अपघातामुळे कायमचा संपला. सोलापूर-पुणे महामार्गावरील वडाचीवाडी गावाच्या हद्दीत कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत 8 वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर तुषार भारंबे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कल्याणसह अपघातस्थळाच्या परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातात पार्थ तुषार भारंबे (वय 8), विलास चांगु भारंबे (वय 66), शोभा विलास भारंबे (वय 63) आणि पूनम तुषार भारंबे (वय 38) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण कल्याण येथील रहिवासी होते. तर तुषार विलास भारंबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.
अक्कलकोटचे देवदर्शन करून परतताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, भारंबे कुटुंबीय अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आणि दिवाळीची खरेदी आटोपून ते कारने घरी परतत होते. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास शेटफळ ते तेलंगवाडी दरम्यान वडाचीवाडी गावाच्या हद्दीत त्यांच्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली.
भारंबे कुटुंबीय इर्टिगा कारने (क्रमांक MH 04 KL 5222) प्रवास करत होते. यावेळी कंटेनर (क्रमांक NL 01 AL 1379) आणि कार यांच्यात भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर तुषार भारंबे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहोळ पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी तुषार भारंबे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोहोळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.