राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली
स्वावलंबनाने भरलेल्या 'मेड इन इंडिया'चे कौतुक
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी पश्चिम बंगालमध्ये बागडोग्रा येथे सैनिकांसह दीपावली उत्सावाचा प्रथम दिन साजरा केला आहे. भारताने स्वदेशी शस्त्रनिर्मितीत केलेल्या मोठ्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली. केंद्र सरकारने ‘मेड इन इंडिया“ कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वदेशी शस्त्रनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. यामुळे भारताचे शस्त्रांच्या संबंधातील इतर देशांवरचे अवलंबित्व आता बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी सेनादलांच्या सैनिकांसमोर भाषण करताना केले आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राजनाथसिंग यांनी भारतीय वायुदलाचे विशेष कौतुक केले. शिस्त, साहस आणि पराक्रम या तीन्ही क्षेत्रांमध्ये भारताच्या सेनादलांनी त्यांचा ठसा उमटविला आहे. बागडोग्रा येथे भारतीय वायुदलाचा एक मोठा वायूतळ आहे. याच तळावर त्यांनी वायुदल आणि इतर सेनादलांच्या सैनिकांसह दीपावली साजरी केली. तंत्रज्ञान कितीही विकसीत असले, तरी सैनिक निधड्या छातीचे नसतील, तर ते तंत्रज्ञानही वाया जाते. भारताचे सैनिक आपला पराक्रम आणि प्रसंगावधान यांच्यामुळे साऱ्या जगात लौकिकास पात्र झालेले आहेत. भारताच्या सीमा त्यांच्याहाती सुरक्षित आहेत. त्यामुळे भारताची वेगाने प्रगती होत आहे, अशी भलावण त्यांनी केली.
उगवत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार अनिवार्य
शस्त्रास्त्रे आणि संपर्क साधने यांच्या क्षेत्रात आज वेगाने नवे तंत्रज्ञान विकसीत होत आहे. या उगवत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धतंत्रात मोठे परिवर्तन होत आहे. त्यामुळे भारतीय सेनादलांना या उगवत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. ही विद्यमान काळाची अनिवार्यता आहे. भारताचे संशोधक असे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी अपार कष्ट घेत असून त्यांना मोठे यश मिळताना दिसते. केंद्र सरकारनेही अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासाला अनुकूल असे धोरण स्वीकारल्याने नवे संरक्षण तंत्रज्ञान देशात विसकीत होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
सेनादलांची अष्टपैलू कामगिरी
सेनादलांनी सशस्त्र संघर्ष असोत, सीमांचे प्राणपणाने संरक्षण करण्याचे काम असो किंवा नैसर्गिक आपदांचे संकट असो, प्रत्येक समयी अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे सारा देश निर्धास्तपणे त्यांच्यावर विसंबून आहे. भारतीय वायुदल अशा प्रकारांच्या आव्हानांशी दोन हात करण्यास नेहमी सज्ज असते. आव्हान कितीही कठीण असले, तरी आपल्या सैनिकांच्या निर्धारासमोर त्या आव्हानांचा पाड लागत नाही. हे अष्टपैलूत्व विलक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात गरुडभरारी
गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भतेवर भर दिल्याने भारतातील शस्त्रनिर्मिती कंपन्यांना मोठी संधी प्राप्त झाली. भारतातील बुद्धीमत्तेच्या उपयोगाने आम्ही नवे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करण्यात मोठे यश मिळविले. अचूक, वेगवान आणि प्रभावी मारा करणारे ड्रोन्स, शत्रूच्या ड्रोन्सचा नायनाट करणारी यंत्रणा, शत्रूच्या प्रदेशात खोलवर आणि अचूक लक्ष्यवेध करण्यास सक्षम क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक रायफल्स आणि गन्स, रणगाडे, तोफा आदी शस्त्रसामग्री आज भारतात आणि भारतविकसीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण होत आहे. आमची शस्त्रे विदेशांमध्येही नावाजली जात असल्याने शस्त्रनिर्यात अनेक पट वाढली, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
Comments are closed.