अंधेरी पूर्वेकडील बेस्टचा बसथांबा चोरीला! शिवसेनेने समिती बैठकीत उठवला आवाज; चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी
अंधेरी पूर्वेकडील जुन्या नागरदास रोडवरील बेस्टचा बस थांबा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेस्टचा बस थांब्याची रचना हटवून तेथे शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या ‘सौजन्याने’ विनापरवानगी नवीन बांधकाम करण्यात आले. याबाबत शिवसेनेचे बेस्ट समिती सदस्य सचिन पाटील यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत आवाज उठवला आणि चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
जुन्या नागरदास रोड बस थांब्याचे आधीचे बेस्टचे अधिकृत शेल्टर हटवण्यात आले. त्या जागी नव्याने बांधकाम करून त्यावर ‘श्री अंधेरी क.वी.ओ. सेवा समाज चौक’ असे नामकरण केले आहे. संबंधित बस थांब्यावर बेस्टचे अधिपृत बोधचिन्ह लावून शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या सौजन्याने काम केल्याचा उल्लेख केला होता. या माध्यमातून पदाचा वापर करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य सचिन पाटील यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केला. संबंधित बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी घेतली होती का, बस थांब्याची जागा जाहिरातींसाठी खासगी पंपन्यांना कराराने दिली असल्यास या बांधकामामुळे बेस्टच्या जाहिरात उत्पन्नावर परिणाम झाला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनीही याबाबत जोरदार आवाज उठवला. त्यानंतर बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
शिवसेनेने दणका देताच शिंदे गटाचा उल्लेख हटवला
शिवसेनेचे सचिन पाटील यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर पुढील काही तासांतच शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या नावाचा उल्लेख हटवण्यात आला. याबरोबरच संबंधित अनधिपृत बांधकाम पूर्णपणे हटवण्याची मागणी सचिन पाटील यांनी केली आहे.
बेस्ट उपक्रमाची पोलिसांत तक्रार
बेस्ट उपक्रमाच्या बसथांब्याची विशिष्ट रचना असते. त्यावर जाहिरातीसाठी विशेष व्यवस्था असते. ती संपूर्ण रचना गायब करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.