मुंबईकरांच्या बसला लांजात अपघात; 20 प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी येथे काजळी नदी पुलावर आज शुक्रवारी पहाटे 3.30 च्या सुमारास मालवाहू ट्रेलरची खासगी आराम बसला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले असून, पैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.
गुरुवारी दुपारी खासगी आराम बस विरार येथून मालवणच्या दिशेने निघाली होती, तर ट्रेलर राजस्थानहून वाहनांचे बॉडी पार्ट्स व मार्बल्स असे अवजड साहित्य घेऊन गोव्याच्या दिशेने निघाला होता. शुक्रवारी पहाटे आराम बस अंजनारी येथील पुलाजवळ आली असता मागून येणाऱया ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आराम बसला दोनवेळा जबर धडक बसली. त्यामुळे आराम बस महामार्गावर कलंडली आणि 100 फूट फरफटत जाऊन संरक्षक भिंतीवर जाऊन धडकली. संरक्षक भिंतीमुळे बस अडकली. अन्यथा 200 फूट खोल नदी पात्रात कोसळली असती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या अपघातात नयन कुलकर (10, विरार), प्रकाश धावडे (54 , वारगाव, कणकवली), प्रांजल राऊत (9), रुत्वी पारकर (10), यशवी पारकर (54), आराध्या पारकर (38), सुधा सावंत (28), अश्विनी वालम (20), विश्वास राऊत (55) मुंबई, विनिता राऊत (52), सूर्यकांत जडवी, रा. सर्व मुंबई या प्रवाशांसह ट्रक चालक दिलावर सुमार खान (36), रा. जैसलमैर, राजस्थान हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली व लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हृषीकेश जोशी (24), कुणाल कांबळे (26 रा. दोघेही विरार) हे दोघे आराम बस चालवत होते. ट्रेलर दिलावर खान (36) हा चालवत होता. क्लीनर सुभान खान (22, दोघेही रा.जैसलमैर, राजस्थान) हा सोबत होता.
गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले
महामार्गावरून ये-जा करणाऱया वाहनांनी थांबून आराम बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. विश्वास राऊत, विनिता राऊत, सूर्यकांत जडवी या तीन प्रवाशांसह टेलर चालक दिलावर खान या चार गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.
Comments are closed.