शहिदांचे मृतदेह डंपरमध्ये आणल्याबद्दल संताप
किश्तवार: जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांनी ठार केलेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे (एसपीओ) पार्थिव डंपरमधून नेण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. हुतात्मा पोलिसांचे मृतदेह शवपेट्यांशिवाय डंपरमधून त्यांच्या गावात नेण्यात आल्याचे सांगत हा हुतात्मा जवानांचा अपमान असल्याचा दावा राजकीय नेत्यांकडूनही केला जात आहे. हुतात्म्यांचे मृतदेह डंपरमधून आणल्याने स्थानिक आमदार शगुन परिहार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फटकारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
हुतात्मा रश्पाल सिंग आणि बॉबी चंद यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी दच्छन येथील केयार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी देहरना जंगलापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर सापडले. दोघांच्याही शरीरावर गोळ्यांच्या अनेक जखमा होत्या. त्यांच्या सर्व्हिस रायफल्सही गायब होत्या.
गावकऱ्यांकडून मदत
काँग्रेसनेही दोन हुतात्मा विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह शवपेट्यांशिवाय डंपरमधून त्यांच्या घरी नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. गावकऱ्यांना स्वत:च स्ट्रेचर आणि पांढऱ्या कपड्यांची व्यवस्था करावी लागली. मोदी सरकार आमच्या हुतात्म्यांचा अपमान करण्यास मागेपुढे पाहत नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
Comments are closed.