लष्करी अधिकाऱ्यांच्या गणवेशात होणार बदल
गोरखा टोपी, रेजिमेंटल चिन्ह पुन्हा दिसणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय लष्कराने 2023 मध्ये वरिष्ए अधिकाऱ्यांच्या गणवेशात केलेले बदल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश 1 डिसेंबरपासून लागू होईल. 13 नोव्हेंबरच्या पत्रावर आधारित एका अंतर्गत आदेशानुसार, गोरखा रायफल्सचे जनरल पुन्हा त्यांच्या चिन्हाची टोपी घालू शकतील. तसेच विशेष दलाचे वरिष्ठ अधिकारी मरून बेरेट आणि चिलखती रेजिमेंटचे अधिकारी काळी बेरेट घालू शकतील. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकृत गणवेशासोबत त्यांचे पारंपरिक रेजिमेंटल किंवा कॉर्प्स चिन्ह परिधान करू शकतील. हा बदल ब्रिगेडियर आणि त्यावरील पदाच्या अधिकाऱ्यांना लागू होईल.
2023 मध्ये लष्कराने वरिष्ठ नेतृत्वासाठी एक गणवेश तयार करण्याकरिता गणवेशातील अनेक बाबींचे मानकीकरण केले. त्या धोरणामुळे अधिकाऱ्यांच्या मूळ रेजिमेंट आणि सेवेची ओळख पटवणारी चिन्हे काढून टाकण्यात आली. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच ब्लॅक कॅट कमांडोंचा प्रतिष्ठित काळा गणवेशही बदलण्याची शक्यता आहे. हा गणवेश बदलण्यामागे प्रचंड उष्णता हे कारण असल्याचे समजते. राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी) आपल्या व्हीआयपी सुरक्षा कमांडोंसाठी नवीन, हवा खेळती राहणाऱ्या गणवेशांची शिफारस केली आहे. हे गणवेश नायलॉन आणि सुती कापडाच्या मिश्रणातून बनवलेल्या ‘नायको’ फॅब्रिकपासून तयार केले जातील. या कापडातून हवा आणि ओलावा सहजपणे जाऊ शकतो. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत कमांडो नवीन गणवेश परिधान करण्यास सुरुवात करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.