प्रेमसंबंध उघड होतील म्हणून मध्यरात्री प्रियकराला घेऊन शेतात गेली, तिथेच बाळाला जन्म दिला; मात्र, तिने पुढं जे केलं, ती कोणतीच आई करणार नाही – TMarathiNews

गांधीनगर: विवाहबाह्य संबंध उघड होण्याच्या भीतीतून अवघ्या एक दिवसाच्या नवजात मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय आई आणि तिच्या ३२ वर्षीय प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. जन्मानंतर गंभीर अवस्थेत शेतातील नाल्यात आढळलेल्या या नवजात मुलीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात तिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे सुमारे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत मतभेद निर्माण झाल्याने ती गेल्या दीड वर्षापासून माहेरी राहत होती. याच काळात तिचे कालाजी नावाच्या ३२ वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, तोदेखील विवाहित असून पत्नीपासून वेगळा राहत होता. या संबंधातून महिलेला यापूर्वी दोन वेळा गर्भधारणा झाली होती. मात्र, दोन्ही वेळा गर्भपात करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर महिलेने ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. गर्भपात करण्याच्या उद्देशाने प्रियकराने तिला काही औषधांच्या गोळ्या दिल्या होत्या. मात्र, त्यांचा अपेक्षित परिणाम झाला नाही. डॉक्टरांकडे गेल्यास गर्भधारणेचे सत्य उघड होईल, या भीतीने तिने वैद्यकीय मदतही घेतली नाही.

१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. शौचास जाण्याचे कारण सांगून ती घराबाहेर पडली आणि गावाबाहेरील शेतात पोहोचली. तेथे प्रियकराच्या उपस्थितीत तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, नवजात बाळाच्या रडण्यामुळे आपले संबंध आणि बाळाच्या जन्माची माहिती उघड होईल, अशी भीती तिला वाटल्याचा आरोप आहे.

याच भीतीतून महिलेने नवजात मुलीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यानंतर बाळाला शेतातील नाल्यात टाकण्यात आले. काही वेळाने गंभीर अवस्थेत आढळलेल्या या नवजात मुलीला तातडीने गांधीनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालातून गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आई आणि तिच्या प्रियकराचा या घटनेतील सहभाग समोर आल्याने दोघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास देहगाम पोलीस करत आहेत.

Comments are closed.