युवा चित्रपटकर्मींनी आपल्या मातीतल्या कथा जगासमोर आणाव्यात; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांचे आवाहन – TMarathiNews
पणजी : 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ (CMOT) च्या सहाव्या पर्वाचे उद्घाटन गोव्यातील कला अकादमी येथे उत्साहात पार पडले. ‘मुळे आणि पंख’ (Roots and Wings) या संकल्पनेवर आधारित यंदाच्या उपक्रमात देशभरातील 100 युवा सर्जनशील प्रतिभांना एकत्र आणण्यात आले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्थानिक अनुभवांचा सन्मान करताना नव्या कल्पनांना जागतिक स्तरावर अभिव्यक्ती देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी युवा चित्रपटकर्मींना अवघ्या 48 तासांत लघुपट तयार करण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) माध्यमातून राबविण्यात येत आहे. युवा चित्रपट निर्मात्यांना परस्पर सहकार्य, आपापल्या कौशल्यांचे प्रदर्शन आणि चित्रपट उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळवून देणारे व्यासपीठ म्हणून ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ विकसित झाले आहे. यंदाच्या सहाव्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्याला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, अतिरिक्त सचिव प्रभात, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (FTII) कुलसचिव लौकिक पारख, सहसचिव के. के. निराला, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार आणि महाव्यवस्थापक गौतम भानोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित युवा प्रतिभांशी संवाद साधताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी भारतीय संस्कृती, भाषा आणि परंपरांमधून प्रेरणा घेऊन चित्रपट निर्मिती करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक तरुणाने यापूर्वीच आपली सर्जनशील क्षमता सिद्ध केली आहे. आगामी 48 तास त्यांच्यासाठी आपल्या कल्पना आणि प्रतिभेचे प्रभावी चित्रपटांमध्ये रूपांतर करण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मुळे आणि पंख’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आपली मुळे ही आपल्या संस्कृतीत, भाषेत आणि जीवनानुभवांत रुजलेली असतात, तर आपली स्वप्ने कल्पनाशक्ती, कुतूहल आणि काहीतरी वेगळे करण्याच्या धाडसातून आकार घेतात. कल्पनाशक्ती माणसाला स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देते, तर कलाकौशल्य त्या स्वप्नांना योग्य दिशा देते. आपल्या सांस्कृतिक मुळांमधूनच कथांना खरी अभिव्यक्ती मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
युवा चित्रपट निर्मात्यांनी आपल्या कथांची व्याप्ती मर्यादित न ठेवता स्थानिक संस्कृती आणि अनुभवांमधून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. देशातील एखाद्या छोट्या गावात घडलेली साधी कथा प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे मांडली गेल्यास ती जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकते. त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना केवळ जागतिक विषयांचा विचार करण्याऐवजी आपल्या परिसरातील माणसे, त्यांचे अनुभव, संस्कृती आणि जीवनशैली यांनाही महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.
चित्रपट ही एक सामूहिक कला असल्याचे अधोरेखित करताना चंचल कुमार यांनी सहभागी तरुणांना एकमेकांचे विचार ऐकण्याचा, सहकाऱ्यांवर विश्वास ठेवण्याचा आणि नव्या प्रयोगांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत सर्जनशील जोखीम स्वीकारणे आणि संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या मुळांशी नाते कायम ठेवून कल्पनाशक्तीला मुक्तपणे भरारी घेऊ द्यावी आणि भारतीय कथा जागतिक व्यासपीठावर पोहोचवाव्यात, असेही ते म्हणाले.
या उद्घाटन सोहळ्यात 48 तासांच्या चित्रपट निर्मिती स्पर्धेचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या चित्रपटाच्या क्लॅपरबोर्डचे पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करून चंचल कुमार यांनी स्पर्धेच्या सहाव्या पर्वाची सुरुवात जाहीर केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या युवा प्रतिभांना मर्यादित वेळेत संकल्पना विकसित करणे, चित्रीकरण करणे आणि संपूर्ण लघुपट तयार करण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 100 युवकांचा समावेश आहे. दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, संपादन आणि उपशीर्षक लेखन, पटकथा लेखन, पार्श्वगायन, संगीत रचना, ध्वनिमुद्रण, वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा, कला दिग्दर्शन, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), ऑगमेंटेड रिॲलिटी (AR), व्हर्च्युअल रिॲलिटी (VR), तसेच व्हॉइस-ओव्हर आणि डबिंग अशा चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना या उपक्रमात स्थान देण्यात आले आहे.
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांच्या सहकार्याने या 48 तासांच्या चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पाच संघ तयार करण्यात आले असून, हे संघ एकत्रितपणे चित्रपटांची संकल्पना विकसित करून निर्धारित कालावधीत लघुपटांची निर्मिती करतील. सहभागींच्या कल्पकतेची, तांत्रिक कौशल्यांची आणि सांघिक कार्यक्षमतेची या स्पर्धेत कसोटी लागणार आहे. तयार झालेल्या लघुपटांचे इफ्फीमध्ये विशेष प्रदर्शन करण्यात येणार असून, चित्रपट उद्योगातील अनुभवी व्यावसायिकांच्या प्रतिष्ठित परीक्षक मंडळाकडून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सीएमओटी टॅलेंट कॅम्प’. या माध्यमातून सहभागी युवा प्रतिभांना प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध संस्थांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चित्रपट निर्मिती संस्था, स्टुडिओ, संगीत कंपन्या, ओटीटी व्यासपीठे, ब्रॉडकास्टर्स आणि मनोरंजन क्षेत्रातील अन्य महत्त्वाच्या घटकांशी संपर्क प्रस्थापित करता येणार आहे. त्यामुळे केवळ आपले कौशल्य सादर करण्यापुरते हे व्यासपीठ मर्यादित न राहता भविष्यातील व्यावसायिक संधींचे दरवाजेही सहभागींसाठी खुले होणार आहेत.
2021 मध्ये स्थापना झाल्यापासून ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ने देशातील उदयोन्मुख चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावंतांना मुख्य प्रवाहातील उद्योगाशी जोडण्याचे काम केले आहे. या उपक्रमातून घडलेल्या अनेक माजी सहभागी कलाकार आणि तंत्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती प्रकल्पांमध्ये काम केले आहे. तसेच कान्स, बर्लिनाले, टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही त्यांना संधी आणि गौरव मिळाला आहे.
भारतीय तरुणांमधील सर्जनशील क्षमता ओळखून त्यांना जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. भारतीय संस्कृती आणि स्थानिक कथांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जागतिक स्तरावर पोहोचवण्याची संधी या उपक्रमातून युवा चित्रपटकर्मींना मिळणार आहे. त्यामुळे इफ्फीच्या यंदाच्या पर्वात 48 तासांत तयार होणारे पाच लघुपट आणि त्यातून समोर येणाऱ्या नव्या सर्जनशील कल्पनांकडे चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.