लढाऊ विमानांच्या घिरट्या, मिसाईल-ड्रोनचा मारा, जहाजांचे स्फोट अन् ते 72 तास… ब्रिटनच्या जलतरणपटूने होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय पाहिलं?
आखाती देशातील तणाव आणखी वाढत चालला आहे.जगातील तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले वाढत आहेत. एकीकडे युद्ध सुरू असताना दुसरीकडे मात्र एका ब्रिटीश जलतरणपटूने होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पोहून पार केली आहे. लुईस प्यू (56) असे त्याचे नाव आहे. त्यांनी तीन दिवसांत सुमारे 15 किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले.
हिंदुस्थान या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लुईस प्यू यांनी मुसंदम द्वीपकल्पापासून केप ऑफ होर्मुझपर्यंत हा प्रवास केला. या मोहिमेसाठी त्यांनी एकूण साडेसहा तास पोहण्याचा सराव केला. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर या धोकादायक समुद्रमार्गात एवढ्या लांब अंतराचे जलतरण करणारे ते पहिले व्यक्ती असल्याचे मानले जात आहे.
या मोहिमेदरम्यान लुईस प्यू यांना युद्धाची भीषणता जवळून अनुभवायला मिळाली. पाण्यात उतरल्याच्या काही मिनिटांतच त्यांना दोन मोठे स्फोट ऐकू आले. त्यानंतर सुमारे चार किलोमीटर अंतरावर एका तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आकाशातून लढाऊ विमानेही जात होती, मिसाईल-ड्रोनचा मारा होत होता. त्यामुळे त्यांच्या पथकाला तातडीने सुरक्षित ठिकाणी माघारी जावे लागले. दुसऱ्या दिवशी बंदराकडे परतताना त्यांनी एका गॅसवाहू जहाजावर झालेला हल्लाही पाहिला. जहाजाला आग लागली होती. आगीच्या ज्वाळा आणि रसायनांचा तीव्र वास सर्वत्र पसरला होता. जहाजाच्या आसपासचे पाणीही आगीने वेढले होते.
लुईस प्यू यांना या मोहिमेदरम्यान समुद्रातील डॉल्फिन, कासव आणि विविध समुद्री मासे पाहायला मिळाले. मात्र, युद्धामुळे या समुद्री जीवांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. युद्ध सुरू झाल्यापासून अनेक तेलवाहू जहाजांचे नुकसान झाले आहे. समुद्रात एकदा तेल पसरले की ते स्वच्छ करणे अत्यंत कठीण असते. या प्रदूषणाचे परिणाम अनेक वर्षे टिकू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या 40 वर्षांपासून प्यू विविध समुद्रांमध्ये पोहून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहेत. त्यांच्या मते, युद्धाचा परिणाम केवळ माणसांवर होत नाही, तर निसर्ग आणि समुद्री जीवांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागते. युद्ध थांबवावे, होर्मुझचा समुद्री मार्ग पुन्हा खुला करावा आणि समुद्रातील प्रदूषण स्वच्छ करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments are closed.