नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री भारतात आले
वृत्तसंस्था/ चेन्नई
तिरुपरनकुंड्रम टेकडीवरील ‘दीपथून’ या प्राचीन दगडी स्तंभावर दिवे लावण्याच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने येथे एकवेळ दीपप्रज्वलन करण्यास अनुमती दिली होती. 24 नोव्हेंबर रोजी फक्त एकदाच दिवा लावण्याला मंजुरी दिल्यानंतर तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या आयुक्तांनी शुक्रवारीच या आदेशाविरोधात याचिका दाखल केल्याचे समजते. आता या याचिकेवर सोमवारी तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील मदुराई येथील सुब्रमण्य स्वामी मंदिर प्रशासनाला तिरुपरनकुंड्रम टेकडीवरील ‘दीपथून’ या प्राचीन दगडी स्तंभावर कार्तिक दीपप्रज्वलन करण्याची परवानगी दिली आहे. तथापि, केवळ मंदिर प्रशासन आणि अधिकृत अधिकाऱ्यांच्या मर्यादित पथकालाच दिवे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. याप्रसंगी सार्वजनिक प्रवेशास बंदी असेल. ही अनुमती देतानाच सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या काही भागांना स्थगितीही दिली होती.
‘दीपथून’वर दिवे लावण्यावरून मंदिर आणि जवळच असलेल्या हजरत सुलतान सिकंदर बादशाह औलिया दर्गा यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. दीपथून दर्ग्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर आहे. अनेक दशकांपासून, मंदिरातील कार्तिक दीपम टेकडीच्या खालच्या उतारावर असलेल्या दीप मंडपामध्ये प्रज्वलित केला जातो. टेकडीच्या माथ्यावर असलेल्या दीपथून येथे दिवे लावावेत, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे. तर दर्गा व्यवस्थापन खालच्या पायरीवर दिवे लावण्याच्या जुन्या परंपरेचा हवाला देत असल्यामुळे हे प्रकरण न्यायालयाच्या दरबारात पोहोचले आहे. तिरुपरनकुंड्रम टेकडी मदुराईपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. येथे असलेले सुब्रमण्य स्वामी मंदिर भगवान मुरुगन यांना समर्पित आहे. हे भगवान मुरुगन यांच्या सहा मुख्य निवासस्थानांपैकी एक मानले जाते. हे मंदिर 6 व्या शतकातील असल्याचे मानले जाते.
Comments are closed.