ट्रम्प यांचा इराणला पुन्हा लष्करी हल्ल्याचा इशारा; आखातात युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिका यांच्यातील ताणलेला संघर्ष संपण्याचे चिन्ह दिसत नसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट लष्करी हल्ल्याचा इशारा दिला आहे. दोन्ही देशांमध्ये नवीन वर्षापूर्वी करार झाला नाही, तर इराणवर मोठा लष्करी हल्ला केला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आखाती प्रदेशात सुरू असलेला संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी तेहरानसोबत सुरू असलेल्या राजनैतिक वाटाघाटींवर तीव्र असंतोष व्यक्त केला. इराणी वाटाघाटीकार अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध शत्रुत्वपूर्ण कारवाया सुरू ठेवून चर्चेचा वापर केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. ट्रम्प निवडणुकीपूर्वीपेक्षा आता अधिक आक्रमक झाले आहेत, असा टोला लगावत त्यांनी इराणी अधिकाऱ्यांची तुलना व्यावसायिक टॅप डान्सरशी केली. इराणी अधिकारी फक्त पोकळ गप्पा मारतात , असे सांगत ट्रम्प यांनी इराणच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षाचा भाग म्हणून अमेरिका इराणच्या बंदरांवर नौदल नाकेबंदी लागू करत असतानाच ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. एप्रिलमध्ये लागू केलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीला इराण आव्हान देण्याचा प्रयत्न करू शकतो का, या प्रश्नावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणने तसा प्रयत्न करूनच पाहावा, अन्यथा त्यांचे संपूर्ण नौदल समुद्राच्या तळाशी पाठवले जाईल. इराणच्या महत्त्वाच्या खारग बेटावरून नाकेबंदी भेदण्यासाठी तेल टँकरचा ताफा तयार केला जात असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.

संभाव्य लष्करी कारवाईची धमकी देतानाच, ट्रम्प यांनी इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असेल, तर कराराची तयारी असल्याचेही म्हटले आहे. मला असा करार करायचा आहे जो कायमस्वरूपी असेल. मी कोणालाही अणुशस्त्रे बाळगू देणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी शनिवारी केला. मात्र, त्याआधी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इराण सरकार 51 वर्षांपासून लोकांचा छळ करत असल्याचा आरोप करत इराणकडे कधीही अणुशस्त्र असणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. युद्धाला नऊ महिने उलटल्यानंतरही दोन्ही देशांतील अनिश्चितता कायम असून ट्रम्प यांची बदलती विधाने वॉशिंग्टन आणि तेहरानसमोरील पेच दर्शवत आहेत.

Comments are closed.