‘पाच मिनिटांत येतोय’ ते ‘मी ठीक आहे’; आपण दिवसभरात किती वेळा खोटं बोलतो?





आपण आयुष्यात मोठं खोटं किती वेळा बोलतो, याचा हिशोब कदाचित आपल्यालाच माहीत नसेल; पण दिवसभरात आपण सहज बोलून जाणारी छोटी खोटी वाक्यं ही न मोजण्याइतकी असतात. सकाळी अलार्म वाजल्यावर ‘आणखी पाच मिनिटं झोपतो’ म्हणण्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वी ‘आज खूप अभ्यास किंवा काम केलं’ असं स्वतःलाच सांगण्यापर्यंत आपण अनेकदा खरं जे आहे त्यापासून लांब पळतो.

प्रवासात ‘मी पाच मिनिटांत पोहोचतोय’ हे वाक्य आपण सर्रास वापरतो. प्रत्यक्षात मात्र आपण नुकतेच घराबाहेर पडलेलो असतो किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो. समोरच्याची चिडचिड होऊ नये किंवा नात्यात गैरसमज निर्माण होऊ नये, हा त्यामागचा हेतू असतो, म्हणून आपण तसं बोलतो. ‘मी ठीक आहे’ या वाक्याचंही तसंच आहे. मनात काहीतरी सलत असलं किंवा खुपत असलं, थकवा आला असला किंवा मूड खराब असला, तरी आपण ‘मी मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही’ असं सांगून मोकळे होतो.

ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणीही अशी काही वाक्यं रोजचीच होतात. जसे की, ‘अरे, तुझा मेसेज पाहिलाच नाही’ किंवा ‘नेटवर्कचा इश्यू होता’ अशी कारणं देणं आता खूप कॉमन झालं आहे. अनेकदा समोरच्याचं मन दुखवू नये म्हणून खोट्या कौतुकाचीही पेरणी केली जाते.

तज्ञांच्या मते, अशी छोटी खोटी वाक्यं नेहमीच वाईट हेतूने बोलली जातात असं नाही. कधीकधी नात्यांमधील वाद टाळण्यासाठी, वेळ मारून नेण्यासाठी किंवा इतरांची काळजी नको म्हणून आपण हा मार्ग निवडतो. मात्र, हीच सवय अति झाली तर स्वतःच्या भावना लपवणं किंवा जबाबदारी टाळणं सोपं होतं.

हेही वाचा – पुरुषांच्या या 5 सवयी देतात कॅन्सरला निमंत्रण



Comments are closed.