थलपथी विजयला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे
जिल्हाधिकाऱ्याच्या छळप्रकरणी आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न : सरकारला न्यायालयाने सुनावले
वृत्तसंस्था, चेन्नई
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले आहे. सत्ताधारी टीव्हीके पक्षाचे आमदार सी. अऊल विघ्नेश यांच्यावर महिला जिल्हाधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सरकारने वेळेत कारवाई का केली नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. तसेच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आढळल्यास सरकारला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही दिला.
न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. कल्लाकुरिचीच्या जिल्हाधिकारी जे. ई. पद्मजा यांनी आमदार अऊल विघ्नेश यांच्याविरोधात तक्रार केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. आमदाराने आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप संदेश पाठवल्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे.
आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करू नका
या प्रकरणात सरकारने 31 जुलै रोजी आरोपांची माहिती मिळूनही प्रभावी कारवाई का केली नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, असा थोडाही संशय आला तर मी तुम्हाला अडचणीत आणण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले. सरकारी वकील आर. जॉन सत्यन यांनी सुनावणीदरम्यान या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्याची माहिती दिली. मात्र, एवढ्या उशिराने कारवाई का झाली, यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
महिलेला संरक्षण मिळाले पाहिजे
न्यायालयाने महिला अधिकाऱ्याच्या सुरक्षेचा मुद्दाही गंभीरपणे उपस्थित केला. पीडित महिला मुख्य सचिव असो किंवा सफाई कर्मचारी, तिला लैंगिक छळापासून संरक्षण मिळालेच पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच तक्रारदार महिलेची ओळख सोशल मीडियावर उघड झाल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पीडितेची ओळख उघड करू नये, असे आधी निर्देश दिले असतानाही तिची माहिती सोशल मीडियावर कशी पसरली, असा सवाल न्यायालयाने केला. सरकारने फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नियंत्रण नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने सायबर गुन्हे विभाग सरकारच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले.
तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्याचे निर्देश
या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नावही तक्रारीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे तपास जिल्हा पोलीस अधीक्षकांपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे न्यायालयाने सूचित केले. तसेच आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार असून, तपास पथक आणि समितीबाबतची माहिती सरकारला सादर करावी लागणार आहे.
विघ्नेश यांचा आरोप फेटाळण्याचा दावा
आमदार अऊल विघ्नेश यांच्यावर जिल्हाधिकारी पद्मजा यांना आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप संदेश पाठवणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच ते मद्यधुंद अवस्थेत जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, अऊल विघ्नेश यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आरोप निराधार असून राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Comments are closed.