तांत्रिक कारण देत खर्डीत भात खरेदी केंद्राला मंजुरी नाही, 60 गावांतील शेतकऱ्यांची होणार फरफट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मोठ्या कष्टाने पिकवलेला भात विकण्यासाठी खर्डी व परिसरातील 30 पाडे व 60 गावांच्या शेतकऱ्यांची यंदा फरफट होणार आहे. आदिवासी विकास महामंडळाने तांत्रिक कारण देत खर्डीतील भात खरेदी केंद्राला मंजुरी न दिल्याने शेतकऱ्यांना 15 ते 20 किलोमीटर दूर जावे लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि पैसे वाया जाणार असून आदिवासी विकास महामंडळाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरवर्षी शहापूर तालुक्यातील सावरोली, डोळखांब, वेलहोळी, पिवळी, अंदाड व खर्डी अशा ठिकाणी भात खरेदी केंद्रे आदिवासी विकास महामंडळामार्फत उघडण्यात येतात. मात्र यंदा खर्डीतील भात खरेदी केंद्राला मंजुरीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे भात विकण्याकरिता अन्य केंद्रांवर जावे लागणार आहे. दरवर्षी अंदाजे डिसेंबर महिन्यात भात खरेदी केंद्र सुरू होतात. पण अजूनपर्यंत कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सरकारने खर्डीतील शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असून शेतकऱ्यांना सोयीचे असलेले खर्डीतील केंद्र नाकारण्यामागे नेमके काय कारण आहे, असा संतप्त सवाल शेतकरी गणपत सापळे यांनी केला.

खर्डीसह इतर भात खरेदी केंद्रांना तांत्रिक अडचणींमुळे मंजुरी मिळाली नसल्याचे महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक तुषार वाघ यांनी सांगितले. दरम्यान, खर्डी आटगाव व भातसानगर येथे भात खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची होणारी कोंडी दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भाई देहेरकर यांनी केली आहे.

Comments are closed.