डोंबिवलाकराच्या नळातून लाल अळ्या, लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महिनाभरापूर्वी डोंबिवली एमआयडीसीच्या पाण्याला दुर्गंधी येत होती. आता तर निवासी परिसरात नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या आढळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मिलापनगरसह परिसरातील काही घरांमध्ये थेट एमआयडीसीच्या जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्यात अळ्या दिसत असल्याने लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.

मिलापनगर येथील अनेक घरांमध्ये नळातून येणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या आढळत आहेत. विशेष म्हणजे या अळ्या एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून थेट येत आहेत. येथील रहिवासी अश्विनी देशपांडे-कुलकर्णी यांनी गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार निदर्शनास येत असल्याची माहिती मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरुण जोशी आणि कार्यकारिणी सदस्य राजू नलावडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतची माहिती एमआयडीसी कार्यालयास दिली. मात्र आज सुट्टी असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली. महिनाभरापूर्वी एमआयडीसीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. त्यावेळी एमआयडीसी प्रशासनाने पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. मात्र या तपासणीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे

जलपुरवठा यंत्रणेत गंभीर त्रुटी

पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळणे ही जलपुरवठा यंत्रणेतील अस्वच्छता, दूषितपणा किंवा देखभालीतील त्रुटींची शक्यता दर्शविणारी गंभीर बाब असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार, गॅस्ट्रो, आमांश तसेच हेपॅटायटिस ए आणि ई यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका संभवतो. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविणे ही एमआयडीसी आणि पालिकेची मूल भूत जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासावेत, जलवाहिन्या आणि साठवण टाक्यांचे परीक्षण करावे तसेच दूषित पाण्याच्या कारणांचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments are closed.