मराठी रंगभूमीवरील नृत्य नाटकाची बॉलीवूडलाही भुरळ, पंकज त्रिपाठी यांची उपस्थिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठी रंगभूमीवरील ‘एक तिची गोष्ट’ या अनोख्या नृत्यनाट्याने नुकताच २५ प्रयोगांचा यशस्वी टप्पा गाठला असून, त्याची भुरळ आता बॉलिवूडमधील कलाकारांनाही पडली आहे. या नृत्यनाट्याच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आवर्जून उपस्थिती लावली. नृत्य, अभिनय आणि भावनांचा सुंदर मिलाफ असलेल्या या प्रयोगाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रयोगाचा अनुभव घेतल्यानंतर पंकज त्रिपाठी यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत ‘अद्भुत’ अशी विशेष दाद दिली.

मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स आणि पीएसडीजी स्टुडिओज प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ‘एक तिची गोष्ट’ची निर्मिती गौरी कालेलकर-चौधरी, सिद्धेश चौधरी आणि फुलवा खामकर यांनी केली आहे. विराजस कुलकर्णी लिखित या नृत्यनाट्याचे दिग्दर्शन सूरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी केले आहे. यामध्ये प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, त्यांची कन्या आस्मा खामकर आणि ओमकार गोखले यांच्या दमदार कलाविष्काराचा अनुभव रसिकांना घेता येतो.

या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावत नाटकाचे भरभरून कौतुक केले. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे नाटक म्हणजे सकारात्मकतेची नवी ऊर्जा देत आयुष्याला नव्या रंगांनी आणि नव्या ऊर्जेने सजवणारा एक अनोखा अनुभव आहे.” तर बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर यांनी “संपूर्ण प्रयोग फॅन्टास्टिक होता!” अशा शब्दांत कलाकारांच्या कामाची प्रशंसा केली.

Comments are closed.