‘कृष्णावतारम्’मधून श्रीकृष्णाच्या जीवनाचा आधुनिक चित्रभाषेत वेध; इफ्फीत दिग्दर्शक हार्दिक गज्जर यांची माहिती – TMarathiNews

पणजी : भगवान श्रीकृष्णाचे जीवन, त्यांचे विचार आणि विविध पैलू दृश्यात्मकदृष्ट्या समृद्ध आणि आधुनिक चित्रभाषेतून जागतिक प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न ‘कृष्णावतारम्’ या हिंदी चित्रपटातून करण्यात आला आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर आणि निर्माते साजन राज कुरुप यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2026 (इफ्फी)मधील ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात प्रदर्शित ‘कृष्णावतारम् भाग 1 : द हार्ट’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पत्र सूचना कार्यालयातर्फे (पीआयबी) आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या निर्मितीविषयी माहिती दिली.

श्रीकृष्णाला केवळ पौराणिक कथांच्या चौकटीत बांधून ठेवता येणार नाही. ती एक श्रद्धा, भावना आणि आपल्या इतिहासाचा जिवंत भाग आहे, असे निर्माते साजन राज कुरुप यांनी सांगितले. आदिकेशवाभोवती केंद्रित असलेल्या सांस्कृतिक परंपरेत आपण वाढलो असून, श्रीकृष्णाचे जीवन प्रामाणिकपणे आणि आदरपूर्वक चित्रित करण्यासाठी संपूर्ण चमूने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.

तीन भागांत उलगडणार श्रीकृष्णाचे जीवन

‘कृष्णावतारम्’ ही ‘हृदय, मन आणि आत्मा’ या संकल्पनांवर आधारित तीन भागांची चित्रपटमालिका आहे. राम मोरी यांच्या ‘सत्यभामा’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची पटकथा प्रकाश कपाडिया, राम मोरी आणि हार्दिक गज्जर यांनी लिहिली आहे.

श्रीमद् भागवतम् आणि हरिवंश या ग्रंथांवर आधारित पहिल्या भागात सत्यभामेच्या नजरेतून श्रीकृष्णाचा वृंदावन आणि मथुरेपासून द्वारकेच्या राज्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. प्रेम, त्याग, विरह आणि भक्ती या भावनांवर चित्रपटाचे कथानक केंद्रित आहे.

मालिकेच्या पुढील दोन भागांत श्रीकृष्णाचे राज्यकारभार आणि रणनीतीशी संबंधित पैलू, तसेच भगवद्गीतेतील शिकवण यांचा वेध घेतला जाणार आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील फारशा परिचित नसलेल्या घटनांचाही या चित्रपटात समावेश करण्यात आला आहे. सिद्धार्थ गुप्ता, संस्कृती जयना, सुष्मिता भट आणि निवाशियनी कृष्णन् यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

भव्य सेट आणि शास्त्रीय संगीताची जोड

आजच्या युवा पिढीला आपला इतिहास जाणून घेता यावा आणि त्याच्याशी नाते जोडता यावे, या उद्देशाने चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर यांनी सांगितले. कथाकथनाची पद्धत काळानुसार बदलत असून, दृश्यात्मकदृष्ट्या समृद्ध अनुभव निर्माण करण्याची संधी या माध्यमातून मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चित्रपटासाठी साडेसात एकर क्षेत्रावर भव्य सेट उभारण्यात आला होता. गज्जर यांच्या व्हीएफएक्स क्षेत्रातील अनुभवासह या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरातील तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्येही तो तयार करण्यात आला आहे.

चित्रपटातील भावनिक आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात पार्श्वसंगीताची महत्त्वाची भूमिका असल्याचे गज्जर यांनी सांगितले. संगीत दिग्दर्शक प्रसाद एस. यांच्या सहकार्याने आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार डॉ. भारत बळवल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटाच्या संगीतात शास्त्रीय संगीताचा वापर करण्यात आला आहे. पारंपरिक संगीताची शुद्धता आणि आधुनिक संगीताचा मेळ साधण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेचे समन्वयन संदीप प्रसाद यांनी केले.

Comments are closed.