रशियात 9/11 च्या हल्ल्याची पुनरावृत्ती! युक्रेनचा मोठा हल्ला; 6 निवासी इमारती लक्ष्य, किलर ड्रोनची दहशत
युक्रेनने आज रशियाच्या कझान शहराला लक्ष्य करून अमेरिकेतील 9/11 या भयंकर दहशतवादी हल्ल्याची अवघ्या जगाला आठवण करून दिली. मॉस्कोपासून 800 किलोमीटर दूर अंतरावर हा हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली. युक्रेनने एकूण 8 ड्रोनहल्ले केले, त्यापैकी 6 ड्रोन निवासी इमारतींवर आदळले अन् एकच भडका उडाला. हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता रशियातील दोन विमानतळ बंद करण्यात आले. याच शहरात यंदा ब्रिक्स परिषद झाली होती हे विशेष. सप्टेंबर 2001 मध्ये याचप्रकारे अमेरिकेवर हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी तेथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 4 विमाने डागली होती.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सर्वश्रुत आहे. चार महिन्यांपूर्वीदेखील युक्रेनने रशियावर असाच हल्ला करत सेराटोव्ह शहरातील 38 मजली इमारत उद्ध्वस्त केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनवर 100 मिसाईल आणि 100 ड्रोन डागले, ज्यात सहा जण दगावले. रशिया आणि युक्रेन युद्धाला लवकरच तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, कझानमधील उंच इमारतींवरील ड्रोनहल्ल्याच्या भयावह फोटोंमुळे उर्वरीत जगाला या हल्ल्याचे गांभीर्य समजले. वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन होत्याचे नव्हते करत होते. ड्रोन इमारतींवर आदळल्यानंतर मोठा स्फोटही झाला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’वर पोस्ट करत हा हल्ला युक्रेनने घडवून आणला असल्याचे सांगितले.
तीन जिल्हे कचाट्यात
युक्रेनने पाठवलेले ड्रोन नष्ट करण्यात रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आले असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. तसेच ड्रोनहल्ल्यामुळे सोवेत्स्की, किरोव्स्की आणि प्रिव्होल्स्की हे तीन जिल्हे आगीच्या कचाट्यात सापडले. ड्रोनहल्ल्यामुळे आग लागलेल्या इमारतींमध्ये ऑपरेशनल सेवा सुरू असल्याचे रशियन माध्यमांनी सांगितले.
Comments are closed.