साय-फाय – मेंदू रॉट

<<<प्रसाद ताम्हणकर>>>

सध्या सोशल मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया, ‘ब्रेन रॉट’ (मेंदूचे सडणे) हा शब्द सर्वत्र चर्चेत आलेला आहे. इंटरनेटचा बरीच वर्षे वापर करत असलेल्या लोकांना हा शब्द तसा नवा नाही. मुख्य म्हणजे जेन जी (Gen Z – 1997 ते 2012 मध्ये जन्मलेले) आणि जेन अल्फा (Gen Alpha – 2013 नंतर जन्मलेले) इंटरनेटचे वापरकर्ते हा शब्द प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात. 2024 सालातला ‘वर्ड ऑफ द इयर’ हा सन्मान या शब्दाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस डिक्शनरीने प्रदान केला आणि हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या व्याख्येनुसार एखाद्या व्यक्तीची सतत बिघडणारी मानसिक स्थिती अथवा बिघडणारी बौद्धिक स्थिती म्हणजे ब्रेन रॉट होय. 2023 ते 2024 या कालावधीत या शब्दाचा वापर 230 टक्के वाढलेला आहे.

ब्रेन रॉट हा शब्द सध्या आपल्या मानवाची असलेली स्थिती अत्यंत योग्य प्रकारे मांडतो असे काही संशोधक ठामपणे सांगतात. सोशल मीडियावर सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली निरुपयोगी सामग्री हे या रोगाचे प्रमुख कारण मानले जाते. निरुपयोगी आणि सहज लक्षात येणारी माहिती सतत बघत राहणे हे या रोगाचे प्रमुख कारण आहे. आजकाल तरुणाई तासन्तास रील्स बघत असते, मीम्स वाचत असते, शॉर्ट व्हिडीओ बघत असते, जे कोणत्या उपयोगाचे नसतात. निव्वळ मनोरंजन करणे या हेतूने बनवलेले हे साहित्य सतत डोळ्यांसमोर धावत असते. या सर्वाचा मेंदूच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असतो.

अनेक तास इंटरनेटवर असे मनोरंजन बघण्यात घालवल्यावर काही काळासाठी मेंदू बंद पडल्यासारखे जाणवायला लागते. मेंदूच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागतो आणि त्यालाच ब्रेन रॉट असे म्हटले जाते. इंटरनेटवर हा शब्द सध्या खूप गाजत असला तरी ब्रेन रॉट या शब्दाचा वापर सर्वात आधी 1854 मध्ये हेनरी डेव्हिड थोरो या लेखकाने आपल्या ‘वॉल्डन’ या पुस्तकात केला आहे. गुंतागुंतीच्या, क्लिष्ट, समजण्यास अवघड अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, त्यांना टाळणे या सवयींमुळे समाजाची मानसिक आणि बौद्धिक अधोगती होत जाते असे त्याने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. इंग्लंड बटाटे सडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते मेंदूचे सडणे (ब्रेन रॉट) थांबवण्याचादेखील प्रयत्न करणार आहे का? असा जळजळीत प्रश्न त्याने आपल्या लेखनात पुढे विचारला आहे.

लोकांच्या या बदलत जाणाऱ्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात जगभरातील तज्ञांनी वारंवार भीती व्यक्त केली आहे. सध्या जगभरात हजारो लाखो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांना उपलब्ध आहेत. एका मोबाइलच्या माध्यमातून लोक सहज त्यांचा वापर करू शकतात. लोक आता दिवसातले अनेक तास या मीडिया प्लॅटफॉर्मवर वाया घालवू लागले आहेत. जो वेळ काही सकारात्मक, रचनात्मक कार्य करण्याचे सोडून अनेक तास हे केवळ सवंग मनोरंजनासाठी उधळले जात आहेत. लोक या सवंग मनोरंजनाच्या इतके अधीन झाले आहेत की, अनेक लोक शौचालयात जातानादेखील मोबाइल जवळ बाळगत असतात. जेवताना, झोपताना, गाडी चालवताना, अगदी समोर टीव्ही चालू असतानादेखील लोकांना डोळ्यासमोर मोबाइल हवा असतो.

एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न होणे, अभ्यासात लक्ष न लागणे, सतत चिडचिड होणे, लहानसहान गोष्टी लक्षात न राहणे ही सर्व ब्रेन रॉटची प्राथमिक लक्षणे आहेत. भरपूर प्रमाणात झोप, मोबाइलचा फक्त कामापुरता वापर, योग्य व्यायाम, उत्तम आहार आणि वेगवेगळ्या कामांमध्ये स्वतला गुंतवून ठेवणे हा ब्रेन रॉटवरचा रामबाण उपाय असल्याचे आरोग्य तज्ञ सांगतात. घराबाहेर पडा, मित्रांच्यात वेळ घालवा, पुस्तकांना जवळ करा, विविध ठिकाणांना भेटी द्या आणि मुख्य म्हणजे ज्यामुळे काही सकारात्मक ऊर्जा मिळेल, आयुष्यात ज्याचा काही फायदा होईल अशा गोष्टींकडे लक्ष द्या असादेखील सल्ला ते देतात. एकूणच ‘ब्रेन रॉट’ शब्दाने आपण आपल्या मोकळ्या वेळात नक्की काय करतो याचे धोकादायक चित्र आपल्यासमोर उभे केले आहे हे मात्र नक्की.

[email protected]

Comments are closed.