सिनेमास्कोप – शक्तिशाली श्री गणेशा

<<<महेंद्र पाटील>>>

मराठी चित्रपट नेहमीच आशयप्रधान असतात आणि त्यातल्या कथेच्या मांडणीवर चालतात. नुकताच प्रदर्शित झालेला ‘श्री गणेशा’ हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा असा आहे. कारण याचा शेवट आतून अंतर्मुख करायला लावणारा आहे आणि समाजाला एक नवीन दिशा देणारा आहे. यात फक्त मनोरंजन नसून आपल्या आयुष्यात नकळत आपण हरवत जाणाऱ्या क्षणांना वेचून आपल्या ओंजळीत देणारा आहे.

मराठी चित्रपट नेहमीच आशयप्रधान असतात. इथे कोणताही मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपटात आहे म्हणून सिनेमा चालत नाही, तर त्या चित्रपटाची गोष्ट काय आहे आणि ती कशा प्रकारे मांडली जाते यावर त्या चित्रपटाचे यश-अपयश अवलंबून असते. मराठीत नुकताच प्रदर्शित झालेला मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘श्री गणेशा’ हा चित्रपट पुन्हा एक नवीन आणि दमदार गोष्ट घेऊन तयार झाला आहे. मराठीत रोड प्रवासावर बेतलेले सिनेमे जास्त होत नाहीत. हा एक उत्तम आणि सगळी बांधणी जमून आलेला एका अनोख्या प्रवासावर बेतलेला चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासून शेवटच्या प्रसंगापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना त्या प्रवासात गुंतवून ठेवतो. कमी पात्र आणि प्रवास यावर चित्रपट असताना तो रेंगळण्याची शक्यता असते, पण मिलिंद कवडे यांच्या कथेवर त्यांनी आणि त्याचे सहकारी लेखक संजय नवगिरे यांनी उत्तम अशी व वेगवान पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात सर्वात जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाचे संवाद हे विषयाला अतिशय समर्पक आणि जास्त पुस्तकी भाषेचा वापर न करता बोलीभाषेत खूप लाखमोलाचे तत्त्वज्ञान नकळत शिकवून जातात. संजय नवगिरे हे अतिशय गुणी लेखक आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

एखाद्या सशक्त विषयाला न्याय देणारे कलाकार लाभले की, चित्रपट अजून मोठा होतो आणि हेच या चित्रपटातील कलाकारांनी करून दाखवले आहे. प्रथमेश परब त्याच्या नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून एक कमालीचा वेगळा अनुभव देऊन जातो आणि विनोदी भूमिकेसोबत त्याच्या आत एक संवेदनशील कलाकार आहे याची चुणूक दाखवतो. शशांक शेंडेसुद्धा एका नवीन आणि वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतात. नवोदित अभिनेत्री मेघा शिंदेचा अतिशय उत्स्फूर्त अभिनय आहे आणि सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकरसुद्धा त्यांच्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत दिसतात. सर्व कलाकार आपल्या अभिनयाने हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

हा चित्रपट बाप आणि मुलगा यांच्या नात्यावर आधारित असला तरी पूर्ण प्रवासात प्रेक्षकांना आपल्या मनातून डोकावून पाहायला नक्कीच भाग पाडेल. विनोद, कारुण्य, प्रेम, संघर्ष, भावनांची गुंतागुंत यात गुरफटत घेऊन जातो. त्याला साथ लागली आहे उत्तम अशा संगीताची. चित्रपटाची सगळी गाणी उत्तम आहेत. चित्रपटाला पुढे नेणारी आहेत. वरुण लिखिते यांचे संगीत आहे, तर मंदार चोळकर आणि जय अत्रे हे गीतकार आहेत. हा चित्रपट व्यावसायिक चित्रपट असला तरी हा अनेक चित्रपट महोत्सवात चांगले यश मिळवू शकेल असा आहे. हजरत शेक अली यांनी उत्तम छायाचित्रण केले आहे. ज्यात आपण सह्याद्रीच्या रांगा ते कोकणातील सुंदर रस्ते असे नेत्रदीपक चित्रीकरण पाहायला मिळते. तांत्रिक बाजू उत्तम जुळून आल्या आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा असाच आहे. कारण याचा शेवट हा तुम्हाला आतून अंतर्मुख करायला लावून समाजाला एक नवीन दिशा देणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त मनोरंजन नसून आपल्या आयुष्यात नकळत आपण हरवत जाणाऱ्या क्षणांना वेचून आपल्या ओंजळीत देणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी आपल्या चित्रपटातून मनोरंजनासोबत काहीतरी नवीन संदेश दिला आहे. ही परंपरा कायम राखत त्यांनी अतिशय मेहनतीने हा चित्रपट केला आहे. संजय माणिक भोसले व कंचन संजय भोसले या निर्मात्यांनी चित्रपटाची भव्य अशी निर्मिती केली आहे.

या सर्वांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी प्रत्येकाने न चुकता सहकुटुंब हा चित्रपट नक्की सिनेमागृहात जाऊन पाहावा आणि वर्षाच्या शेवटी एक सुपरहिट चित्रपट देऊन या वर्षाला एक सुखद निरोप द्यावा व नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक नवा श्री गणेशा करावा.

[email protected]

Comments are closed.