महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी, आपसात लढून कार्यक्रम संपणार; नाना पटोले यांचा मोठा दावा
नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रात्री खातेवाटप झाले आहे. आता महायुतीत पालकमंत्र्यासाठी कोणते जिल्हे घ्यायचे याची भांडणं होत आहेत. याबाबत मोठा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली आहे. अजित पवार स्वतः म्हणत असतील की, मंत्रीपदं आणि खातेवाटपावरून काही लोक नाराज आहे, तेव्हा याच्यापेक्षा अधिक काय पुरावा पाहिजे. हा एवढा मोठा पुरावा त्यांनी दिला आहे. यांना जनतेचे काय घेणे देणे नाही. या सरकारमध्ये काय गडबड सुरू आहे याच्यातून स्पष्ट होतं आहे. महायुतीत काहीही आलबोल नाही, हे यावरून दिसून येत आहे, असे पटोले म्हणाले.
महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी आहे. आपसात लढून कार्यक्रम संपणार आहे. तसेच मलाईदार खात्यांकरता संघर्ष होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हे खातेवाटप करू शकले नाही. शेवटच्या दिवशी त्यांनी खातेवाटप केले. त्यातही अनेकजण नाराज असल्याची चर्चा आहे. अधिवशेनात महायुती सरकार जनतेसाठी काहीच करू शकले नाही. आता पालकमंत्र्यासाठी कोणते जिल्हे घ्यायचे याची भांडणं सुरू आहेत, असा दावा करत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी महायुतीवर टीका केली आहे. हे सरकार जनतेमुळे नव्हे तर निवडणूक आयोग आणि केंद्रातील आकांमुळे आले आहे. जनतेचे मते यांनी चोरले. निवडणूक आयोगाकडून नोटिफिकेशन काढण्यात आले. निवडणूक आयोगाकडून आता कोणतीही माहिती जाहीर केली जाणार नाही. याचा अर्थ दाल में कुछ काला है, असेही नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी हुकूमशाही लोकशाहीत वापरली जात आहे. जनता आपले प्रश्न मांडण्यासाठी येते तेव्हा त्यांना कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्याला जीवे मारण्यात येतं, गुन्हे दाखल करण्यात येतात. या हुकूमशाही आणि हिटलरशाहीच्यामध्ये कोणी येत असेल, देशातील विरोधी पक्ष नेता येत असेल आणि त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष नौटंकी म्हणत असेल तर भाजप लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी पार्टी आहे. ज्यावेळी इंग्रजांचं सरकार होतं तेव्हा भाजपचे मूळ असलेले लोक इंग्रजांबरोबर बरोबर होते. असेही नाना पटोले म्हणाले.
आगामी बजेट तुटीचं असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पाडून महागाई वाढणार. निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात सरकार आले. ते जनतेच्या कृपेने आलेले नाही. महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? अनुशेष कशावरून काढणार की केवळ मूठभर लोकांना फायदा होईल. हे संवेदनाहीन आणि लूट करणारे सरकार असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.
Comments are closed.