Chhagan Bhujbal press conference after meeting OBC leaders meeting asj
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार अशा चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते मानले जाणारे छगन भुजबळ यांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आता ते अजित पवारांसोबत राहणार की नाही? यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नुकतेच रविवारी (22 डिसेंबर) छगन भुजबळ यांची राज्यातील ओबीसी नेत्यांसोबत बैठक झाली. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. (Chhagan Bhujbal press conference after meeting OBC leaders meeting)
हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; केली ही विनंती
– Advertisement –
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांना महायुतीने आपला निवडणुकीपुरती वापर करून घेतला असे वाटते का? असा सवाल विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “माझा वापर करून घेतला जातो का? हे मला माहिती नाही. पण मी ओबीसीसाठी लढणारा नेता आहे. गेली 35 वर्षे मी ओबीसीसाठी लढत आहे. याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष करतो, असे होत नाही. त्यांना वेगळे आरक्षण देण्यात यावे, म्हणून मी स्वतः प्रयत्न केले आहेत. माझे म्हणणे एवढेच आहे की, इतर समाजाच्या हक्कांवर गदा येऊ नये एवढेच माझे मत आहे.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी छगन भुजबळ यांना अजित पवारांनी तुमची फसवणूक केली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “मला माहिती नाही, तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा आहे तो काढा,” असे थेट उत्तर दिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये हा वाद आणखी चिघळणार असे चित्र निर्माण झाले आहे.
तुम्हाला बाहेर ठेवले म्हणजे काहीतरी गौडबंगाल
मुंबईत ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांची रविवारी भेट घेतली. या बैठकीत काय घडले? हे त्यांनी माध्यमांना सांगितले. ते म्हणाले की, “ओबीसी नेत्यांची एक बैठक झाली. त्यानंतर त्यांना मला भेटायचे होते म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्यांनी माझ्यासमोर त्यांची मते मांडली. ते मला म्हणाले की, आम्ही सगळे त्रस्त आहोत की हा निर्णय असा कसा घेतला गेला? कारण, तुम्ही ओबीसीचा आवाज उठवणारे नेते आहात. एवढे सगळे असताना आणि महाराष्ट्र बघत असताना जर तुम्हाला बाहेर ठेवले आहे म्हणजे यामागे काहीतरी गौडबंगाल आहे, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.” असे त्यांनी सांगितले. भुमिकेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “तुम्हाला सर्वांनाच माझ्या भूमिकेची घाई झालेली आहे. पण मला अजून कोणतीही भूमिका घेण्यासाठी वेळ लागेल. त्यासाठी मी या सर्वांची चर्चा करत आहे.”
Comments are closed.