बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांना अटक

पाकिस्तानात मिळविले होते प्रशिक्षण

वृत्तसंस्था/ कोलकाता

पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळवत भारतात दाखल झालेल्या काश्मिरी दहशतवाद्याला पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्सने कॅनिंग भागातून अटक केली आहे. गुप्त माहितीनुसार कारवाई करत पश्चिम बंगाल पोलिसांच्या एसटीएफने दक्षिण 24 परगणा येथील कॅनिंग भागात बांगलादेश सीमेनजीक दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. या दहशतवाद्याचे नाव जावेद मुंशी आहे. लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असलेला दहशतवादी बांगलादेशातून भारतात दाखल झाला होता.

जावेद मुंशी हा आयईडी तज्ञ म्हणून ओळखला जातो. मुंशी प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-उल-मुजाहिदीनशी देखील संबंधित आहे. 2011 मध्ये अहल-ए-हदीसचे नेते शौकत शाह यांच्या हत्येत त्याचा हात होता. तसेच दहशतवादी कारवायात सामील असल्याप्रकरणी त्याने अनेकदा तुरुंगवासही भोगला होता.

बनावट पाकिस्तानी पासपोर्टद्वारे जावेदने बांगलादेश, नेपाळचा प्रवास केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तो जम्मू-काश्मीर पोलिसांकरता वाँटेड आहे. याचमुळे त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. जावेदचा ट्रान्झिट रिमांड मिळविल्यावर अधिक चौकशीसाठी त्याला काश्मीर येथे नेण्यात येणार आहे.

Comments are closed.