स्मृतीने धुतले; रेणुकाने रोखले! हिंदुस्थानचा विंडीजवर एकतर्फी विजय

यजमान हिंदुस्थानी महिला संघाने एकतर्फी झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा तब्बल 211 धावांनी धुव्वा उडविला. स्मृती मानधनाने 91 धावांची धुवाँधार खेळी केली, तर ‘सामनावीर’ ठरलेल्या रेणुका सिंगने निम्मा संघ गारद करीत विंडीजला रोखण्याची भूमिका चोखपणे बजावली. हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत दणदणीत विजयी सलामी देत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली, मात्र स्मृतीचे अवघ्या 9 धावांनी हुकलेले शतक सर्वांच्या मनाला चटका लावून गेले.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 315 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना आधीच दडपणात आलेल्या वेस्ट इंडीजचा डाव केवळ 26.2 षटकांत अवघ्या 103 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार हेली मॅथ्यूज व कियाना जोसेफ या सलामीच्या जोडीला भोपळाही पह्डता आला नाही. कियाना पहिल्याच चेंडूवर धावबाद झाली, तर रेणुका सिंगने हेलीला यष्टीमागे रिचा घोषकरवी झेलबा केले. मग रेणुकाने मधली फळीही कापून काढत विंडीजच्या फलंदाजीतील हवाच काढून घेतली. त्यांच्याकडून अफी फ्लेचर (नाबाद 24), शेमाइन कॅम्पबेल (21), आलियाह एलीने (13) व करिश्मा रामहॅरक (11) यांनाच केवळ दुहेरी धावा करता आल्या. यातील कोणालाही मोठी खेळी न करता आल्याने विंडीजला जेमतेम धावांची शंभरी ओलांडता आली. हिंदुस्थानकडून रेणुका सिंगने विंडीजचा निम्मा (29/5) संघ गारद केला. प्रिया मिश्राला 2, तर तितास साधू व दीप्ती शर्मा यांना 1-1 विकेट मिळाली.

स्मृती-प्रतिकाची शतकी सलामी

दरम्यान, नाणेफेकीचा कौल जिंकून हिंदुस्थानला फलंदाजीचे निमंत्रण देण्याचा निर्णय विंडीजच्या चांगलाच अंगलट आला. हिंदुस्थानच्या आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी विंडीजची गोलंदाजी निप्रभ ठरविली. स्मृती मानधना (91) व प्रतिका रावत (40) यांनी 110 धावांची खणखणीत सलामी दिली. हेली मॅथ्यूजने प्रतिकाला बाद करीत ही जोडी फोडली. मग झैदा जेम्स हिने 32व्या षटकात स्मृतीला बाद करीत तिला शतकापासून वंचित ठेवले. स्मृतीने 102 चेंडूंत 91 धावांची खेळी करताना 13 चेंडू सीमापार पाठविले.

मधल्या फळीची दमदार कामगिरी

चांगल्या सलामीनंतर हिंदुस्थानच्या मधल्या फळीनेही दमदार कामगिरी केली. हर्लिन देओल (44), कर्णधार हरमनप्रीत कौर (34), रिचा घोष (26), जेमिमा रॉड्रिग्ज (31) व दीप्ती शर्मा (नाबाद 14) या सर्व फलंदाजांनी देखण्या खेळी खेळत हिंदुस्थानला 9 बाद 314 धावांचा डोंगर उभारून दिला. विंडीजकडून झैदा जेम्स हिने सर्वाधिक 5 विकेट टिपले. हेली मॅथ्यूजला 2, तर डिएण्ड्रा डॉटीनला 1 विकेट मिळाली.

Comments are closed.