मदन लोकूर यांची न्यायिक परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयातून 2018 मध्ये झाले होते निवृत्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी. लोकुर यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी न्यायाधीश लोकुर यांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे.
न्यायाधीश लोकुर यांचा कार्यकाळ 12 नोव्हेंबर 2028 पर्यंत असणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत न्याय परिषदेत जगभरातील अनेक प्रतिष्ठित न्यायाधीश सदस्य आहेत. अशा स्थितीत न्यायाधीश लोकुर यांना परिषदचे अध्यक्ष करण्यात आल्याने पूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे.
अंतर्गत न्याय परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणून लोकुर यांना नियुक्त करताना आनंद होत आहे. परिषदेच्या अन्य सदस्यांमध्ये कारमेन आर्टिगास (उरुग्वे), रोजली बाल्किन (ऑस्ट्रेलिया), स्टीफन ब्रेजिना (ऑस्ट्रिया), जे पॉजेनल (अमेरिका) सामील असल्याचे गुतेरेस यांनी म्हटले आहे.
1953 मध्ये जन्मलेले लोकुर हे 4 जून 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते. 30 डिसेंबर 2018 रोजी लोकुर हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते. 2019 मध्ये फिजीच्या बिगरनिवासी पॅनेलचे न्यायाधीश म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. अन्य कुठल्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे ते पहिले भारतीय न्यायाधीश ठरले होते.
Comments are closed.