Ajit Pawar DCM on Maharashtra Assembly Election result day story asj


पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटालाही चांगले यश मिळाले. रविवारी (22 डिसेंबर) बारामतीमध्ये झालेल्या जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमात त्यांनी या यशाचे श्रेय जनतेला देत त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालदिवशीचा एक किस्सादेखील सांगितला. मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बारामतीमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. (Ajit Pawar DCM on Maharashtra Assembly Election result day story)

हेही वाचा : SS UBT about EVM : ईव्हीएम घोटाळ्यावर मोदी सरकारकडूनच शिक्कामोर्तब, ठाकरे गटाचा थेट आरोप 

– Advertisement –

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत आम्ही पिछाडीवर होतो. त्यानंतर बारामतीत जाऊन आम्ही जनतेपर्यंत आमचे काम पोहोचवले. त्यामुळे आपल्याला बारामतीत विजय मिळणार, अशी मला खात्री होती. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी काही माध्यमांनी पोस्टल मतांमध्ये मी मागे असल्याचे दाखवले. हे ऐकताच आमच्या मातोश्री थेट देवघरात गेल्या. त्यानंतर त्या पांडुरंगा विठ्ठला असे नाम जप करत बसल्या. त्यावेळी माझी मोठी बहीण विजया अक्का माझ्या आईला सांगत होती की आम्ही बारामतीमध्ये फिरलो आहोत, दादा नक्की विजयी होईल. पण आई देवासामोरच बसून राहिली होती.” अशी आठवण त्यांनी सांगितली.

“लोकसभा निवडणुकीत आम्ही 382 बुथवर आपण मागे होतो. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत 382 बुथवर आपण पुढे आलो आहोत. बारामतीकरांनी भरघोस मतांनी निवडून दिले. प्रचंड मतांनी मला निवडून दिले त्याबद्दल मी तुमच्यापुढे नतमस्तक होतो.” अशी भावनिक साद अजित पवारांनी बारामतीकरांना घातली. “शेतकरी वर्गासाठी योजना आणल्या. वीज माफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. जनसन्मान यात्रा निमित्त महाराष्ट्र राज्यात फिरत असताना कोणावरही टीका करायची नाही, आम्ही ठरवले होते. पण खरेच सांगतो, विधानसभा निवडणुकीत एकतर्फी कौल जनता देईल असे वाटले नव्हते,” असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.