Sanjay Raut Shivsena UBT on Thackeray brothers will come together asj


मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. कौटुंबिक कार्यासाठी जसे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तसेच ते राजकीय पटलावरदेखील एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “गेली अनेक वर्ष ही चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये माझ्यासारखाही सहभागी असतो. मी राज ठाकरे यांच्यासोबतही जवळून काम केले आहे. तर, उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे प्रमुख आहेत. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचे जीवापाड प्रेम आहे. पण काही गोष्टींमुळे ते एकत्र येणे कठीण आहे.” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. (Sanjay Raut Shivsena UBT on Thackeray brothers will come together)

हेही वाचा : SS UBT Vs EC : ‘17 A’ची मागणी करणे गैर काय? ठाकरे गटाचा निशाणा निवडणूक आयोगावर

– Advertisement –

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “राज ठाकरे यांचा एक वेगळा पक्ष आहे. तर, आमचा उद्धव ठाकरेंचा पक्ष वेगळा आहे. राज ठाकरेंनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे. त्यांचा पक्ष हा भाजपसोबत काम करतो. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. पण आमच्या पक्षाचे तसे नाही. फडणवीस, मोदी आणि शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यात, मुंबई लुटण्यात, मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये आणि शिवसेना फोडण्यामध्ये या तिघानाचा मोठा सहभाग आहे. अशा लोकांसोबत जाणे हे महाराष्ट्राशी बेइमानी ठरेल. दुर्दैवाने राज ठाकरे त्यांच्यासोबत राहतात. कुटुंब एकच असले तरीही वैचारिक मतभेद आहेत.” असे म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता धूसर असल्याचे संकेत दिले. तरीही, ‘एकत्र यायचे की नाही? हा निर्णय या दोन भावांनी घायचा आहे.’ असे म्हणत आपली बाजू मांडली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील दादरमध्ये एका लग्नसमारंभात एकत्र दिसले होते. रविवारी (22 डिसेंबर) राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते. समोर आलेल्या व्हिडीओनुसार या दोघांमध्येही चांगले संभाषण झाल्याचे दिसले. या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. गेल्या आठवड्यात म्हणजेच 16 डिसेंबरला रश्मी ठाकरे यांचा भाचा म्हणजेच श्रीधर पाटणकर यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला. यावेळीही राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. तेव्हा रश्मी ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले होते. पण या सोहळ्यात काही मिनिटांच्या फरकामुळे या दोन्ही भावांची भेट हुकली होती. मात्र, या सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.