पालकमंत्रीपद कुणालाही मिळालं तरी संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळणार का? संजय राऊत यांचा सवाल

महायुती सरकारने मुख्यमंत्रीपद, मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटपाला महिनाभराचा कालावधी घेतल्यानंतर आता जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून आता नेत्यांमध्ये रस्सीखेंच सुरू आहे. या सर्वादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा त्यांच्या दरे या मूळ गावी विश्रांतीसाठी गेले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे. ”उपमुख्यंत्र्यांची तब्येत पुन्हा बिघडली असून ते त्यांच्या गावी गेले आहेत. त्यांची तब्येत सतत बिघडत असते त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते. फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर काय जादू केली माहित नाही. पण एवढे धष्टपुष्ठ व्यक्ती सतत कसे आजारी पडतात? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच पालकमंत्रीपदावरून देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. ”आघाडी किंवा युतीच्या सरकारमध्ये शेवटपर्यंत अशा गोष्टी होत असतात. त्याला कुणी अपवाद नाही. युतीतले पक्ष कितीही बोलत असले की आम्ही एका विचाराने एकत्र आलो आहोत. तसं काही नसतं. ते सत्तेसाठी एकत्र आलेले असतात. आप आपल्या लोकांना पदं मिळावी. मलईदार खाती मिळावी, आपला व पक्षाचा आर्थिक गल्ला भरावा यासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन करतायत. मुंबईचं पालकमंत्रीपद कुणालाही मिळालं तरी मराठी माणसाला घरं स्वस्त मिळणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

बीडचं पालकमंत्रीपद कोणत्याही मुंड्यांना मिळालं तरी संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे का? परभणीचं पालकमंत्रीपद कुणालाही मिळालं तरी सोमनाथ सुर्यवंशीला न्यायमिळणार का? याचा काही उपयोग नसतो पालकमंत्रीपदाचा. फक्त सत्ता आपल्याकडे राहावी. त्यानिमित्ताने त्या त्या जिल्ह्याची आर्थिक व्यवहाराची सूत्र आपल्याकडे राहावी. म्हणून पालकमंत्रीपद हवं असतं. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद काही लोकांना कायमच हवं होतं. ते काही नक्षलवादाचा खात्मा करण्यासाठी नको होतं, तर गडचिरोलीत मायनिंग कंपन्या आहेत तिथून मलिदा मिळावा म्हणून घेतलं होतं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Comments are closed.