Rahul Gandhi Visit Parbhani Somnath Suryawanshi Death Case urk
परभणी – संविधानाचे संरक्षण करणाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सूर्यवंशींची हत्या केली आहे. दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांची ही हत्या केली आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सोमनाथ सूर्यवंशींची पोलिसांकडून हत्या
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल सभागृहात खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप केला आहे.
– Advertisement –
राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. ते दलित असल्यामुळे त्यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली. यामागे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची विचारधारा आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, मी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला आहे. त्यावरुन स्पष्ट दिसत आहे की, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली.
राहुल गांधींनी घेतली विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची भेट
पँथर नेते विजय वाकोडे यांचा परभणीतील दोन धक्कादायक घटनानंतर मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची आज राहुल गांधी यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी विजय वाकोडे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. वाकोडे यांच्या विविध आंदोलनातील सहभागाची छायाचित्र राहुल गांधी यांनी पाहिली.
– Advertisement –
परभणीमधील संविधान विटंबनेची घटना आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू, या दोन्ही घटनांनंतर पँथर नेते विजय वाकोडे रस्त्यावर उतरले होते. 62 वर्ष वयाचे विजय वाकोडे यांना या दोन्ही घटनांनी धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. परभणीतील आंबेडकरी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते-नेते म्हणून विजय वाकोडे यांची ओळख होती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पँथर अशी विजय वाकोडे यांची परभणी आणि परिसरात ओळख होती. परभणीतील दोन्ही घटनांनंतर ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्य कुटुंबियांची राहुल गांधी यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते.
परभणीत काय घडले होते?
परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेनंतर परभणीमध्ये 11 डिसेंबर रोजी निषेध मोर्चा आणि परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी काही दुकाने बंद करण्यासाठी मोर्चेकरी आक्रमक झाले होते. त्यानंतर पोलिसांनी दलित वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या घटनांमध्ये पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी या एलएलबी तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आणि पोलिस कोठडीत त्यांना मारहाण करण्यात आली, त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.
Edited by – Unmesh Khandale
Comments are closed.